नवी दिल्ली - जगात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 1,49,394 नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशभरात तब्बल 5 लाख लोकांना जीव गमवावा लागला आहे. मृतांचा आकडा 5,00,055 वर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शुक्रवारी (4 फेब्रुवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,49,394 नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट देखील चांगला आहे. लाखो लोकांनी कोरोनावर मात केली असून उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
'ओमायक्रॉनचा धोका टळलेला नाही; निर्बंध हटवणं पडेल महागात'
ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटना (WHO) जगातील सर्व देशांना कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराबद्दल सातत्याने धोक्याचा इशारा देत आहे. WHO ने लोकांना धोका अद्याप टळलेला नाही असं सांगितलं आहे. जगातील अनेक देशांमध्ये ओमायक्रॉनच्या लाटेचा उच्चांक येणं बाकी आहे. त्यामुळे कोरोना निर्बंध (Covid 19 Restrictions) हे हळूहळू शिथिल केले पाहिजेत. मंगळवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड-19 वर बनलेल्या टेक्निकल लिडने हा सल्ला दिला आहे. ऑनलाईन ब्रीफिंगमध्ये, डब्ल्यूएचओ अधिकारी मारिया वेन यांनी "आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत की अनेक देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या लाटेचा पीक येणं बाकी आहे. अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरणाचा (Corona Vaccination) दर खूपच कमी आहे आणि या देशांतील लोकसंख्येला कोविड-19 लस मिळालेली नाही. त्यामुळे अशावेळी सर्व बंधनं एकाच वेळी हटवू नयेत" असं म्हटलं आहे.
"सर्व देशांना कोविड-19 निर्बंध हळूहळू शिथिल करण्याचं आवाहन"
मारिया वेन म्हणाल्या की, आम्ही नेहमीच सर्व देशांना कोविड-19 निर्बंध हळूहळू शिथिल करण्याचं आवाहन केलं आहे. कारण हा विषाणू शक्तिशाली आहे. WHOचे सरचिटणीस म्हणाले की, काही देशांमध्ये असा विश्वास वाढत आहे की लसीकरणाचे चांगले दर आणि ओमायक्रॉनच्या कमी प्राणघातकतेमुळे धोका टळला आहे. ओमायक्रॉन प्रकार निश्चितपणे अत्यंत सांसर्गिक आहे परंतु खूप घातक नाही, त्यामुळे अधिक घाबरण्याची गरज नाही. मात्र असा विचार करणं चुकीचं आहे. ते म्हणाले की संसर्ग वाढल्याने मृतांचा आकडाही वाढू शकतो. पुढे ते म्हणाले, आम्ही असं म्हणत नाही की देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू केलं जावं. परंतु आम्ही सर्व देशांना आवाहन करतो की त्यांनी त्यांच्या नागरिकांना कोरोनाशी संबंधित नियमांचं पालन करण्यास सांगावं.