नवी दिल्ली - जगात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 50 दिवसांतील नीचांक आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 1,52,734 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,128 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,80,47,534 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 3,29,100 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. सोमवारी (31 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1 लाख 52 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा तीन लाखांवर पोहोचला आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 20,26,092 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 2,56,92,342 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज देशात सलग 18 व्या दिवसांत कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा कोरोनातून रिकव्हरी झालेल्यांची संख्या जास्त आहे. कोरोनाविरोधातील लढ्यात सध्या आशेचा किरण निर्माण झाला आहे. या महाभयंकर संकटात जून महिना काहीसा दिलासा देणारा ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. तज्ज्ञांना जून महिन्यात कोरोनातून बरं होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ तर नवीन रुग्ण आणि मृत्यूच्या दरात घट होण्याची अपेक्षा आहे. तसेच जून महिन्यात देशाला 12 कोटींहून अधिक लसी उपलब्ध होऊन लसीकरणाचा वेगही वाढेल, असंही मानलं जात आहे.
कोरोनाच्या संकटात आशेचा किरण! ...तर जूनमध्ये मोठा दिलासा मिळणार; 12 कोटी लसी उपलब्ध होणार
जून महिन्यात भारतात कोरोनाविरोधातील लढ्यात महत्त्वाच्या असलेल्या लसींचे तब्बल 12 कोटी नवे डोस उपलब्ध होतील. यातील जवळपास 6.09 कोटी डोस हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि लगभग 45 वर्षांवरील लोकांसाठी केंद्र सरकारकडून मोफत उपलब्ध करुन दिले जातील. 5.86 कोटीहून अधिक डोस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारांशिवाय खासगी रुग्णालय थेट विकत घेऊ शकतात. भारतात गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 9 मे रोजी देशात कोरोनाचे नवे 403738 रुग्ण आढळले होते. तर, 30 मेपर्यंत हा आकडा 165553 वर आला आहे. आयआयटी कानपूर आणि हैदराबादमधील शास्त्रज्ञांनी जूनमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.