नवी दिल्ली - जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ही 13 कोटींच्या वर गेली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतचा 24 तासांतील नव्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल 1,36,89,453 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 1,61,736 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 879 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,36,89,453 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (13 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 1,61,736 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख 71 हजारांवर पोहोचला आहे.
ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग! कुंभमेळ्यात कोरोनाचा विस्फोट; तब्बल 102 जण पॉझिटिव्ह, परिस्थिती गंभीर
सोमवती अमावस्येच्या पर्वावर होणाऱ्या महाकुंभाच्या शाहीस्नानाला भाविकांची प्रचंड गर्दी झाली. यावेळी कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसून आले. शाहीस्नानासाठी आलेल्या अनेक आखाड्यांतील साधू-संत आणि महंतांना कोरोना झाल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रशासनाची झोप उडाली आहे. कुंभमेळ्यात तब्बल 102 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला गर्दी नियंत्रित करण्यात अपयश येत असून कोरोना नियमांचे सक्तीने पालन करण्यात पोलिसांनी असमर्थता व्यक्त केली. ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात आहे. याच दरम्यान महाकुंभमेळ्यात दुसऱ्या शाहीस्नानानंतर 102 साधू व भाविक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती मिळत आहे. हरिद्वारमध्ये लाखो साधू आणि भाविक दाखल झाले होते. उत्तराखंडच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 11.30 ते सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 18,169 भाविकांची चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये तब्बल 102 साधू आणि भाविक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यावर अनेक ठिकाणी नातेवाईकांनी देखील त्यांच्याकडे पाठ फिरवल्याच्या घटना घडत आहेत. रुग्णालयात मृतदेह पडून राहीले आहे. मृत्यूनंतरही कोरोना रुग्णांच्या मृतदेहांचे हाल होत आहेत. सूरतमध्ये देखील कोरोनाने थैमान घातले आहे. तसेच कोरोना रुग्णांची संख्याही सातत्याने वाढत आहे. कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासाठी खूप वेळ वाट पाहावी लागत असून स्मशानभूमीच्या बाहेर रुग्णवाहिकेच्या लांबच लांब रांगा लागल्याची माहिती मिळत आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह येतात. मात्र सध्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने अंत्यसंस्कारासाठी बराच वेळ वाट पाहावी लागत आहे. शहरातील अश्निनीकुमार स्मशानभूमीत पैसे घेऊन लवकरात लवकर अंत्यसंस्कार करण्याचं प्रकरण समोर आलं आहे. संपूर्ण गुजरातमध्ये कोरोनाचा सर्वाधिक कहर सूरतमध्ये आहे.