नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक देशांत कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा आकडा हा गेल्या काही दिवसांच्या तुलनेत थोडा वाढला आहे. त्यामुळे काही ठिकाणी परिस्थिती चिंताजनक आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. देशात करोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर केंद्र सरकारने राज्यांना सतर्क केले आहे. आठ राज्यांसाठी विशेष सूचना जारी केल्या आहेत. राज्यांनी कोरोना विरोधात कठोर पावले उचलावीत जेणेकरून तिसरी लाट घातक होण्यापासून रोखता येईल असं म्हटलं आहे.
दिल्ली, हरयाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि झारखंडला या आठ राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 16,764 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 220 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे देशात आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शुक्रवारी (31 डिसेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 16 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा साडे चार लाखांहून अधिक झाला आहे.
देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 1,270 वर
देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असताना ओमायक्रॉनने देखील चिंता वाढवली आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून धडकी भरवणारा आकडा आता समोर आला आहे. देशातील ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येने एक हजाराचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 1,270 वर पोहोचली आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर देशाचा रिकव्हरी रेट 98.36 टक्क्यांवर आहे. उपचारानंतर अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. याच दरम्यान आरोग्य मंत्रालयाने आठ राज्यांना कोरोनाविरोधात कठोर पावले उचलण्यास सांगितलं आहे.
"देशात येत्या काही दिवसांत येणार कोरोनाची लाट; ओमायक्रॉनमुळे रुग्णसंख्येत मोठी वाढ"
भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत असून येत्या काही दिवसांत रुग्णवाढीचा दर वेगाने वाढणार आहे, असा इशारा केंब्रिज विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिला आहे. कोरोनाची अल्प काळातील लाट येऊन अधिकाधिक नागरिकांना ओमायक्रॉनची लागण होण्याची भीतीही व्यक्त केली आहे. केंब्रिज विद्यापीठाच्या जज बिजनेस स्कूलमधील प्रा. पॉल कट्टूमन यांनी "कोविड-19 इंडिया ट्रॅकर विकसित केला असून एका ई-मेलमध्ये त्यांनी लिहिले आहे, येत्या काही दिवसांत ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढेल. कदाचित या आठवडय़ातही वाढण्याची शक्यता आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत किती वाढ होईल, हे आता सांगणे कठीण आहे" असं देखील म्हटलं आहे. कट्टूमन आणि त्यांचा संशोधक गट गेल्या काही दिवसांतील भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येवर लक्ष ठेवून आहेत.