नवी दिल्ली - संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 13 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे देशातही कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून धडकी भरवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर येत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल 1,35,27,717 वर गेला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी (12 एप्रिल) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,68,912 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 904 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,35,27,717 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दीड लाखांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 12,01,009 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,21,56,529 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशात कोरोनाचा धोका वाढला असून गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे.
कोरोनाचा भयावह वेग! दिल्लीच्या AIIMS मधील तब्बल 35 डॉक्टर पॉझिटिव्ह, आरोग्य विभागात खळबळ
कोरोनाचा कहर पाहायला मिळत असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक ठिकाणी रुग्णालयात रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टरांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. सर गंगाराम रुग्णालयानंतर आता दिल्लीतील एम्स रुग्णालयातही (Delhi AIIMS) कोरोना थैमान घातले आहे. या रुग्णालयातील तब्बल 35 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची घटना समोर आली आहे. कोरोनाची लागण झालेल्या डॉक्टरांमध्ये ज्युनिअर, सीनिअर अशा सर्व डॉक्टर्सचा समावेश आहे. काही डॉक्टरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधी सर गंगाराम रुग्णालयात 37 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह सापडले. त्यापैकी पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर इतरांना होम आयोसेलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. या डॉक्टरांनी कोरोना लसीचा डोस घेतला होता.
सूरतमध्ये देखील कोरोनाने थैमान घातले आहे. तसेच कोरोना रुग्णांची संख्याही सातत्याने वाढत आहे. कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासाठी खूप वेळ वाट पाहावी लागत असून स्मशानभूमीच्या बाहेर रुग्णवाहिकेच्या लांबच लांब रांगा लागल्याची माहिती मिळत आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह येतात. मात्र सध्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने अंत्यसंस्कारासाठी बराच वेळ वाट पाहावी लागत आहे. शहरातील अश्निनीकुमार स्मशानभूमीत पैसे घेऊन लवकरात लवकर अंत्यसंस्कार करण्याचं प्रकरण समोर आलं आहे. संपूर्ण गुजरातमध्ये कोरोनाचा सर्वाधिक कहर सूरतमध्ये आहे