नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल चार कोटींवर गेली आहे. कोरोनाचा भयावह वेग पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. शुक्रवारी (8 जुलै) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 18,815 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या चार कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा पाच लाखांवर पोहोचला असून 5,25,343 लोकांना जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर काही जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
भारतात सापडला ओमायक्रॉनचा नवा सब व्हेरिएंट BA.2.75; WHO ने केलं अलर्ट
कोरोनाच्या संकटात आता एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. भारतात ओमायक्रॉनचा नवा सब व्हेरिएंट BA.2.75 सापडला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत अलर्ट केलं आहे. भारतासह इतर काही देशांमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉनच्या व्हेरिएंटचा एक नवीन सब व्हेरिएंट आढळतो आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संस्थेच्यावतीने देण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संस्थेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. "गेल्या दोन आठवड्यात कोरोनाच्या जागतिक स्तरावर नोंदवलेल्या केसेसेमध्ये जवळपास 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. युरोप आणि अमेरिकेत, बीए 4 आणि बीए 5 या व्हेरिएंटची रुग्णसंख्या वाढते आहे."
"भारतासह इतर देशांमध्ये ओमायक्रॉनचा बीए 2.75 हा सब व्हेरिएंट आढळून येत आहेत. आम्ही त्यावर लक्ष ठेऊन आहे" असंही त्यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी ओमायक्रॉनच्या हा सब व्हेरिएंट सर्वात प्रथम भारतात आढळून आला होता असं म्हटलं आहे. "भारतासोबतच तो इतरही दहा देशांमध्ये आढळून आला आहे. सब व्हेरिएंटमध्ये काही म्यूटेशन बघायला मिळाले आहेत. विशेषता याच्या स्पाईक प्रोटीनमध्ये हे बदल आढळून आले आहेत. त्यामुळे आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत. हा सब व्हेरिएंट रोगप्रतिकार क्षमता कमी करतो का, किंवा हा किती घातक आहे. हे सांगणे सद्या कठीण आहे. आम्ही त्याचा अभ्यास करतो आहे" असं देखील त्यांनी म्हटलं आहे.