नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जगात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 19 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. रविवारी (20 फेब्रुवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 19,968 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशात आतापर्यंत 5,11,903 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशाचा रिकव्हरी रेट देखील चांगला आहे. 4,20,86,383 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.
"देशातील कोरोना मृतांची संख्या 37 लाखांवर पोहोचू शकते कारण..."
कोरोनाच्या संकटात धक्कादायक माहिती मिळत आहे. "देशातील कोरोना मृतांचा आकडा 37 लाखांवर पोहोचू शकतो. जाहीर झालेल्या मृत्यूची अधिकृत आकडेवारी वास्तविक आकडेवारीपेक्षा 7 पट जास्त असू शकते." पॅरिस विद्यापीठातील संशोधकांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात हा मोठा दावा केला आहे. संशोधक आणि लोकसंख्या तज्ज्ञ क्रिस्टोफ गुईलमोटा यांनी महामारीमध्ये मृत्यूची संख्या भयावह पातळीपर्यंत जाऊ शकते असं म्हटलं आहे. मार्च 2020 पासून जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, 510,000 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या संख्येत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. संशोधकांनी गणितीय मॉडेलच्या आधारे हे संशोधन केले आहे.
पॅरिस विद्यापीठातील संशोधकांनी केरळमध्ये कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येचे विश्लेषण केले. वय, लिंग आणि मृत्यूची तारीख या आधारे मृत्यूचे कारण समजले. या आधारे देशातील 27 राज्यांची आकडेवारी समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या भागात श्रीमंत लोक राहत होते, अशा भागात हे संशोधन करण्यात आले आहे. येथील डेटा आणि परिस्थितीचे गणितीय मॉडेल्सच्या आधारे विश्लेषण करण्यात आले. डेलीमेलच्या रिपोर्टनुसार रुग्णांच्या चाचणीच्या अभावामुळे भारतात मृत्यूची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त असू शकते. द इकॉनॉमिस्टच्या वृत्तानुसार, कोविडमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या कमी लेखण्यात आली आहे. प्रत्यक्षात, ही आकडेवारी वास्तविक गणनेपेक्षा 6 पट जास्त असू शकते. ऑक्सिजनची कमतरता आणि संथ लसीकरण हे मृत्यूचे कारण असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. लसीकरणाच्या डोसची ऑर्डर देण्यास होणारा विलंब हे देखील यामागे कारण आहे. त्यामुळे लोकांपर्यंत लसीचा डोस उशिरा पोहोचला.