नवी दिल्ली - कोरोनाचा भयावह वेग पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल चार कोटींवर गेली आहे. सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज 20 हजारांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोना मृतांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. तर सलग तिसऱ्या दिवशी 21 हजार नवे रुग्ण सापडले आहेत. शनिवारी (23 जुलै) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 21,411 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 67 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या चार कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 5,25,997 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर काही जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. .
देशाचा रिकव्हरी रेट 98.46 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाची सर्वाधिक प्रकरणे नोंदवणाऱ्या पहिल्या 5 राज्यांमध्ये 2515 रुग्णांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर, केरळमध्ये 2477, पश्चिम बंगालमध्ये 2237, तामिळनाडूमध्ये 2033 आणि कर्नाटकमध्ये 1562 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. देशात आढळलेल्या एकूण नवीन कोरोना प्रकरणांमध्ये या 5 राज्यांचा वाटा 50.57 टक्के आहे. नवीन प्रकरणांपैकी 11.75 टक्के प्रकरणे एकट्या महाराष्ट्रात आहेत.
भारताने गेल्या 24 तासात कोरोना लसीचे एकूण 34,93,209 डोस दिले आहेत, ज्यामुळे देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या कोरोना लसीच्या डोसची संख्या 2,01,68,14,771 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, गेल्या 24 तासांत देशभरात कोविड 19 साठी एकूण 4,80,202 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. 19 जुलै रोजी, भारताने 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लाभार्थ्यांना 200 कोटी कोरोना लसीचे डोस देण्याचा विक्रम केला होता. अवघ्या 18 महिन्यांत देशाने हा टप्पा गाठला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.