नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल तीन कोटीवर गेली आहे. कोरोनाचा भयावह वेग पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज दोन लाखांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोना मृतांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. रविवारी (30 जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 2,34,281 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,94,091 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर काही जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत असताना कोरोना मृतांचा आकडा मात्र वाढताना दिसत आहे.
केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात या पाच राज्यांत रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. जवळपास 63.31 टक्के रुग्ण या राज्यांतील आहेत. तर एकट्या केरळमध्ये 21.69 रुग्ण आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 94.21 टक्क्यांवर आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 37 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णांची संख्या 373,097,559 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 5,676,084 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अनेकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून 294,662,630 जण बरे झाले आहे. अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
अमेरिकेत डेल्टा ऐवजी ओमायक्रॉनने सर्वाधिक मृत्यू
वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच आता ओमायक्रॉनने देखील चिंता वाढवली आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशही आता हतबल झाला आहे. कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आणि मृतांचा सर्वाधिक आकडा हा अमेरिकेत आहे. जगभरातील अनेक ठिकाणी ओमायक्रॉन हा डेल्टाच्या तुलनेत अधिक घातक नसल्याचं म्हटलं जात आहेत. पण अमेरिकेत तो खतरनाक होत असल्याचं सिद्ध होत आहे. डेल्टाच्या तुलनेत अमेरिकेत ओमायक्रॉनमुळे दररोज जास्त लोकांचा मृत्यू होत आहे. अमेरिकेत एका दिवसांत 2267 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे तेथील परिस्थिती ही गंभीर झाली आहे. जगभरात एका दिवसात तब्बल 34.12 लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 10330 जणांचा मृत्यू झाला आहे. नोव्हेंबरच्या मध्यापासून अमेरिकेत सात दिवसांच्या सरासरी मृत्यूची संख्या वाढत आहे.