नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनापुढे प्रगत देशही हतबल झाले आहेत. जगभरातील कोरोनाग्रस्ताची संख्या ही तब्बल 13 कोटींच्या वर गेली आहे. देशातही कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ पुन्हा एकदा समोर आला आहे. देशात कोरोनाचा वेग वाढला असून चिंताजनक आकडेवारीने उच्चांक गाठला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,45,26,609 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1,75,649 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (17 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,34,692 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटी 45 लाखांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,75,649 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 16,79,740 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,26,71,220 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशात कोरोना लसीकरण देखील वेगाने होत आहे.
भय इथले संपत नाही! 50 प्रवासी असलेल्या बसचा चालक निघाला Corona Positive अन् मग झालं असं काही...
तब्बल 50 प्रवासी असलेल्या बसचा चालक पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली. बस चालकासह सहा प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे. बस चालक आणि प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजताच बसमधील इतर प्रवाशी प्रचंड घाबरले. त्यांना डोकेदुखी, चक्कर येणं, अस्वस्थ वाटणं असा त्रास सुरू झाला. कोरोना रुग्णांना आयसोलेट करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर (Gwalior) महामार्गावर कोविड तपासणी पथकाकडून तपासणी सुरू होती. एका बसच्या चालकाचाच कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. हा चालक जी बस चालवत होता त्या बसमध्ये तब्बल 50 प्रवासी प्रवास करत होते.
गुरुवारी ग्वाल्हेर महामार्गावर कोविड मोबाईल युनिट कार्यरत होती. यावेळी शिवपूरी येथून येणाऱ्या एका लक्झरी बसला या पथकाने तांबवलं आणि सर्वांची तपासणी सुरू केली. बसमधील सर्व 51 जणांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. बस चालकासोबतच इतरही पाच प्रवाशांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या सर्वांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसत नव्हती. या सर्वांना होम आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. कोरोना तपासणी नोडलचे अधिकारी डॉ. अमित रघुवंशी यांनी कोरोनाचा संसर्ग मोठ्या वेगाने वाढत आहे. यामुळे शहरात येणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर मोबाइल युनिटच्या माध्यमातून कोविड टेस्ट करण्यात येत आहे. याच पद्धतीने शिवपूरी येथून येणाऱ्या बसमधील सर्वांची तपासणी करण्यात आल्याचं म्हटलं आहे.