नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जगात कोरोनाचे थैमान पाहायला मिळत आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 154 दिवसांतील नीचांक आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 25,166 नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (17 ऑगस्ट) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 25 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 3,69,846 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर रिकव्हरी रेट 97.51 टक्क्यांवर पोहोचला आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांत लहान मुलांना कोरोना संसर्ग होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. बंगळुरूमध्ये गेल्या 10 दिवसांत 500 हून अधिक मुलांना कोरोनाची लागण झाली होती. बंगळुरूनंतर आता ओडिशामध्ये 138 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता परत वाढली आहे. रविवारी ओडिशा सरकारच्या आरोग्य विभागाने कोरोना आकडेवारी जारी केली आहे. आकडेवारीनुसार, 1058 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यात 138 लहान मुलांचा समावेश आहे. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाचा आकडा 9 लाख 94 हजार 565 पर्यंत पोहोचला आहे.
टेन्शन वाढलं! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका?; ओडिशामध्ये एका दिवसात 138 चिमुकल्यांना संसर्ग
कोरोनामुळे मृतांची संख्या 6887 इतकी झाली आहे. रविवारी कोरोनामुळे 64 जणांचा मृत्यू झाला आहे. 616 रुग्णांना क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आहे. राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर 1.53 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यातील खोर्धा जिल्ह्यात सर्वाधिक 376 रुग्णांची नोंद झाली आहे. कटकमध्ये 162, जाजपूरमध्ये 77 रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे 27 जिल्ह्यात 100 हून कमी रुग्ण नोंदवले गेले आहेत. गजपतीत एकही करोना रुग्ण नाही. खोर्धा जिल्ह्यात 16, कटकमध्ये 12, नयागरमध्ये 13 मृत्यूची नोंद झाली आहे. अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर काहींनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.