नवी दिल्ली - भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येने पुन्हा एकदा रेकॉर्ड मोडला आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 2,61,500 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,501 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या एक कोटी 47 लाखांवर पोहोचली आहे.
कोरोनामुळे देशात तब्बल 1,77,150 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. रविवारी (18 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,61,500 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,47,88,109 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख 77 हजारांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 18,01,316 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,28,09,643 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
कोरोना रुग्णालयाच्या ICU मध्ये भीषण आग; 5 जणांचा मृत्यू
कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कोरोना रुग्णालयाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. याच दरम्यान आयसीयू (ICU) मध्ये भीषण आग लागली आहे. आग लागली त्यावेळेस जवळपास 50 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळत आहे.
बापरे! कोरोनाचा नवा स्ट्रेन थेट डोळे आणि कानावर करतोय अटॅक; पाहण्याची, ऐकण्याची क्षमता होतेय कमी
कोरोनावर जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोनाची आणखी दोन नवीन लक्षणं आता समोर आली आहेत. रिसर्चमधून धडकी भरवणारी माहिती मिळत आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन हा आता थेट डोळे आणि कानावर अटॅक करत आहे. त्यामुळेच पाहण्याची, ऐकण्याची क्षमता कमी होत असल्याचा धक्कादायक खुलासा संशोधनातून करण्यात आला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संक्रमणाचा थेट परिणाम हा कान आणि डोळ्यांवर होत आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन मुख्य लक्षण असणाऱ्या तापाबरोबरच डायरिया, पोटदुखी, उलटी होणे, अपचन यांसारखी लक्षण दाखवत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना नवनवीन लक्षणं समोर येत आहेत. एसजीपीजीआई (SGPGI) आणि केजीएमयू (KGMU) सह अनेक कोरोना रुग्णालयात भरती असणाऱ्या रुग्णांना ऐकण्याची आणि दिसण्याची समस्या येते आहे.