नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल तीन कोटीवर गेली आहे. कोरोनाचा भयावह वेग पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉनमुळेही चिंता वाढली आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. रविवारी (16 जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 2,71,202 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा साडे चार लाखांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर काही जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रिकव्हरी रेट 94.51 टक्क्यांवर आहे.
ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 7,743 वर
शनिवारच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत आज 2369 रुग्णांची आणखी वाढ झाली आहे. तर देशाचा पॉझिटिव्हीटी रेट 16.28 टक्क्यांवर आहे. देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 7,743 वर पोहोचला आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे. गेल्या 24 तासांत ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत 28.17 टक्क्यांची वाढ झाली आहे. एका नव्या रिसर्चनुसार, दोन मास्कचा वापर केल्याने ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गापासून स्वत:चा बचाव केला जाऊ शकतो. कोरोनाच्या 'डेल्टा व्हेरिएंट'हून 'ओमायक्रॉन' हा अधिक संक्रमक असला तरी तो 'डेल्टा' इतका धोकादायक नाही, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
ओमायक्रॉनच्या संकटात डबल मास्क करणार बचाव?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला, रिसर्चमधून खुलासा
हाँगकाँगच्या दोन व्हायरस तज्ज्ञांनी या व्हेरिएंटपासून वाचण्यासाठी मास्कच्या वापराविषयी आपलं मत मांडलं आहे. आजारी किंवा अधिक धोका असलेल्या लोकांनी ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग टाळण्यासाठी दोन फेस मास्क घालावा, असा सल्ला या तज्ज्ञांकडून देण्यात आला. हाँगकाँगच्या चीनी विद्यापीठातील प्राध्यापक आणि सरकारच्या वैज्ञानिक समितीचे सदस्य डेविड हुई यांनी सर्जिकल मास्कवर कापडाचा मास्क परिधान करण्याचा सल्ला दिला आहे. हुई यांच्या म्हणण्यानुसार, बहुतेकदा सर्जिकल मास्क थोडा सैल असतो. अशावेळी तोंडावरची उरलेली जागा झाकण्यासाठी कापडी मास्क घालणं अत्यंत महत्वाचं ठरू शकतं. यामुळे कोरोनाच्या 'ओमायक्रॉन' व्हेरिएंटचा वाढता धोकाही कमी होऊ शकतो. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. उच्च जोखीम गट, अधिक संसर्ग फैलावलेला परिसर आणि सार्वजनिक वाहतुकीचा प्रवासासाठी वापर करणाऱ्या लोकांनी दोन मास्क वापरणं अत्यंत आवश्यक असल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलं आहे.