नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 14 कोटींवर गेली आहे. तर लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 2,73,810 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,619 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,50,61,919 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1,78,769 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. सोमवारी (19 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 2,73,810 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दीड कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख 78 हजारांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 19,29,329 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,29,53,821 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
मध्य प्रदेशच्या शहडोलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अनेक रुग्णालयांना ऑक्सिजनच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. ऑक्सिजनची कमतरता दूर झाल्याचा दावा शिवराज सिंह चौहान सरकार करत आहे. पण या घटनेने सरकारचा दावा फोल ठरला आहे. शहडोलच्या जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन अभावी कोरोनाच्या 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात ऑक्सिजन अभावी रुग्ण तडफडत होते पण प्रयत्न करूनही डॉक्टर त्यांचा जीव वाचवू शकले नाहीत. 12 जणांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. गेल्या 24 तासांत ऑक्सिजन अभावी 12 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑक्सिजन सिलिंडर संपल्याने मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. ऑक्सिजनचा तुटवडा नव्हता तर ऑक्सिजनचे प्रेशर कमी झाले होतं असं म्हटलं आहे.
"100 दिवस टिकणार कोरोनाची दुसरी लाट, 70 टक्के लसीकरण अत्यावश्यक"; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
दक्षिण पूर्व दिल्ली पोलिसांसाठी एका तज्ज्ञाने (Expert) तयार केलेल्या रिपोर्टनुसार, कोरोना विषाणूची दुसरी लाट अजून 100 दिवस कायम राहू शकते. तसेच 70 टक्के कोरोना लसीकरण अत्यावश्यक असल्याचं देखील म्हटलं आहे. डॉ. नीरज कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनमध्ये लोकांची प्रतिकारक शक्ती कमी करण्यासोबतच लसीचा प्रभाव कमी करण्याची क्षमता देखील या व्हायरसमध्ये आहे. कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन पूर्वीच्या कोरोना व्हायरसपेक्षा अधिक संक्रामक आहे. त्यामुळे ज्या लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. अशा लोकांनाही कोरोना व्हायरसचा पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता आहे. डॉ. कौशिक यांच्या मते, म्युटेटेड कोरोना व्हायरस इतका संसर्गजन्य आहे, की तो जर घरातील एका व्यक्तीला झाला तर संपूर्ण कुटुंबही कोरोनाच्या विळख्यात सापडू शकतो. हा विषाणू लहान मुलांसाठी देखील घातक आहे.