नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 20 कोटींच्या वर गेली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 147 दिवसांतील नीचांक आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 28,204 नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (10 ऑगस्ट) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 28,204 नवे रुग्ण आढळून आले आहेत. रिकव्हरी रेट हा 97.45 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 3,88,508 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेदरम्यान उद्भवलेला डेल्टा व्हेरिएंट सर्वाधिक घातक असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. पण डेल्टाहूनही अधिक जीवघेणा व्हायरस येऊ शकतो का? याबाबत तज्ज्ञ सध्या संशोधन करत आहेत. या व्हेरिएंटबाबत अद्याप पूर्णपणे संशोधन झालेलं नाही. पण हा व्हायरस सध्या जगातील 135 देशांमध्ये पसरला असून जगाची चिंता वाढवली आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट इतर व्हेरिएंच्या तुलनेत सर्वाधिक संसर्गजन्य आणि घातक असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णामध्ये याची लक्षणं कमी वेळात दिसून येत आहेत. तसेच डेल्टा व्हेरिएंटमुळे अन्य आजारांना देखील आमंत्रण मिळत आहे.
भीषण, भयंकर, भयावह! डेल्टाहून अधिक जीवघेणा व्हेरिएंट येऊ शकतो समोर?; तज्ज्ञ म्हणतात...
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेले नागरिकदेखील डेल्टा व्हेरिएंटच्या विळख्यात सापडत आहेत. हा व्हायरस लसीकरणामुळे मानवी शरिरात तयार झालेल्या रोगप्रतिकार शक्तीला सहजपण चकमा देऊ शकतो. चीनी संशोधकाच्या मते डेल्टा व्हायरस हा कोरोना व्हायरसच्या मुळ रुपाच्या तुलनेत तब्बल 1260 पट अधिक संसर्गजन्य आहे. काही अमेरिकन संशोधकांच्या मते, लसीकरण झालेल्या व्यक्तींनाही डेल्टाची लागण झाली आहे. लस न घेतलेल्या नागरिकांमध्ये जितका व्हायरल लोड आहे, तितकाच 'व्हायरल लोड' लस घेतलेल्या नागरिकांमध्ये आढळला. यावर अद्याप संशोधन पूर्ण झालं नाही. शास्त्रज्ञांच्या मते, डेल्टा व्हेरिएंटमध्येही बदल होणं शक्य आहे. कारण डेल्टा प्लस हा व्हेरिएंटदेखील डेल्टापासून तयार झाला आहे. येत्या काळात डेल्हा व्हेरिएंटहून अधिक जीवघेणा व्हेरिएंट येण्याची शक्यता आहे. व्यापक प्रमाणात लसीकरण केल्यानं मृत्यूदर कमी केला जाऊ शकतोस असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलं आहे.