नवी दिल्ली - जगभरातील अनेक देशांत कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत होता. तसेच देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा आकडा हा गेल्या काही दिवसांच्या तुलनेत थोडा वाढला आहे. त्यामुळे काही ठिकाणी परिस्थिती चिंताजनक आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. एका दिवसात तीस हजार रुग्ण वाढले आहेत.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 2,85,914 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 665 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत 4,91,127 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (26 जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे दोन लाख 85 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा चार लाख 90 हजारांवर पोहोचला आहे. तसेच डेली पॉझिटिव्ही रेट 16.16 टक्क्यांवर आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 22,23,018 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशात आतापर्यंत तब्बल 1,63,58,44,536 लोकांचं कोरोना लसीकरण करण्यात आलं आहे. याच दरम्यान संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जीव गमावणाऱ्या 60 टक्के रुग्णांनी लस घेतली नसल्याचं म्हटलं जात आहे. एका खासगी रुग्णालयाने केलेल्या रिसर्चमध्ये ही बाब समोर आली आहे. मॅक्स हेल्थकेअरने केलेल्या रिसर्चमध्ये असे नमूद केले आहे की तिसऱ्या लाटेदरम्यान नोंदवले गेलेले बहुतेक मृत्यू हे 70 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांचे होते.
काही रुग्णांना किडनीचे आजार, हृदयविकार, मधुमेह, कॅन्सर अशा अनेक आजारांनी ग्रासले होते. आमच्या रुग्णालयांमध्ये आतापर्यंत 82 मृत्यू झाले. त्यापैकी 60 टक्के लोक असे होते ज्याचं कोरोना लसीकरण झालेलं नव्हतं. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (आरोग्य) यांनी ज्या रुग्णांची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत आहे आणि ज्यांना इतर आजार आहेत त्यांचा कोरोनामुळे मृत्यू होत असल्याचं म्हटलं आहे. कोरोनाच्या तीन लाटेच्या तुलनात्मक रिसर्चमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, तिसऱ्या लाटेदरम्यान फक्त 23.4 टक्के रुग्णांना ऑक्सिजन देण्याची गरज होती. तर दुसऱ्या लाटेत 74 टक्के आणि पहिल्या लाटेत 63 टक्के रुग्णांना ऑक्सिजन देण्याची गरज होती.