नवी दिल्ली - कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जगभरातील रुग्णसंख्येने तब्बल 51 कोटींचा टप्पा पार केला आहे. भारतातही कोरोनाचा पुन्हा एकदा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वेगाने वाढणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.
कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ समोर आला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या चार कोटींवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (27 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,927 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 5,23,654 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेकांवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
लाखो रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. काही राज्यांनी कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. याच दरम्यान रिसर्चमधून कोरोनाच्या भयानक परिणामाबाबत माहिती समोर आली आहे. चेन्नईतील सरासरी आयुर्मान सुमारे 4 वर्षांनी कमी झाल्याचे एका रिसर्चमध्ये समोर आले आहे. ते 70.7 वर्षांवरून 66.4 वर्षांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे आरोग्याबाबत पूर्वीपेक्षा अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे.
कोरोनाचा भयानक परिणाम! लोकांचे सरासरी वय 4 वर्षांनी झाले कमी; रिसर्चमधून खुलासा
लान्सेट इन्फेक्शन डिसीज जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या रिपोर्टनुसार, जून 2021 पर्यंत चेन्नईमध्ये कोरोनामुळे सुमारे 8000 लोकांचा मृत्यू झाला. याशिवाय लॉकडाऊन, वेळेवर उपचार न मिळणे आणि वैद्यकीय सेवेचा अभाव यामुळेही लोकांना जीव गमवावा लागला आहे. TOI नुसार, सार्वजनिक आरोग्य संचालक डॉ. टीएस सेल्वा विनयगम, जे या रिसर्चचा भाग होते, म्हणाले की अमेरिका, ब्रिटन, इटली, स्पेन सारख्या देशांमध्ये भारतापेक्षा जास्त वृद्ध लोक आहेत. तरीही, एक हजार लोकांमध्ये सरासरी 1.6 ते 2.1 अधिक मृत्यू नोंदवले गेले, तर चेन्नईमध्ये ते एक हजारामध्ये 5.2 होते. हा मृत्यू दर सामान्यपेक्षा जास्त आहे. या उच्च मृत्युदरामुळे, चेन्नईतील आयुर्मान कमी झाले. 2020 मध्ये ते 69.5 वर्षे कमी झाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ते आणखी कमी केले.