नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा जगभरात उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 18 कोटींच्या वर गेली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 125 दिवसांतील नीचांक आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 30 हजार 93 नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (20 जुलै) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 30,093 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली आहे. तर रिकव्हरी रेट हा 97.37 टक्क्यांवर पोहोचला आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 4,06,130 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुळे 50 टक्के रुग्णांना हेल्थ कॉम्प्लिकेशन्स म्हणजेच आरोग्यविषयक समस्या जाणवत आहेत. भयंकर बाब म्हणजे किडनी आणि लिव्हरवर गंभीर परिणाम होत आहे,. लँसेटच्या रिपोर्टमधून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. लँसेटच्या रिपोर्टने चिंतेत भर टाकली आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासात जवळपास 50 टक्के रुग्णांमध्ये काहीनाकाही आरोग्य विषयक समस्या आहेत. कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
लँसेटच्यावतीने यूकेमध्ये 73197 लोकांवर एक संशोधन करण्यात आलं. त्यामध्ये रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या 49.7 टक्के रुग्णांमध्ये काहीना काही आरोग्यविषयक समस्या या होत्या. तसेच बरं झाल्यावर देखील अशीच परिस्थिती होती. कोरोनावर मात केल्यानंतर देखील अनेक लोकांमध्ये वेगवेगळी लक्षणं पाहायला मिळाली. कोरोनाचा तरुणांवर अधिक गंभीर परिणाम होत असल्याचं या रिपोर्टमध्ये विशेष नमूद करण्यात आलं आहे. 19 ते 29 वर्षे वयोगटातील 27 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली. मात्र त्यानंतर देखील ते खूप वेळ आजारी होते. त्यांच्यामध्ये लाँग कोविडची लक्षणं पाहायला मिळाली. त्यामुळेच त्यांच्या शरिरातील अवयवांवर याचा परिणाम झाला आहे. किडनी आणि लिव्हरवर याचा सर्वात जास्त परिणाम होत असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या लोकांमध्ये कार्डियक एरिद्मिया हा आजार आढळून आला आहे. तसेच अनेक रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.