नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असताना कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशात कोरोनाचा धोका हा दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येने सर्वच रेकॉर्ड मोडले आहेत. गेल्या 24 तासांत तब्बल 3 लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर अनेकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. गुरुवारी (22 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 3,14,835 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 2,104 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,59,30,965 पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,84,657 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 22,91,428 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,34,54,880 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
कोरोनाचा उद्रेक! AIIMS मधील तब्बल 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ पॉझिटिव्ह, आरोग्य विभागात खळबळ
कोरोनाचा कहर पाहायला मिळत असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक ठिकाणी रुग्णालयात रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टरांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. बिहारमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील झपाट्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे मृतांचा आकडा देखील सातत्याने वाढतोय. याच दरम्यान पाटणा येथील एम्समध्ये (AIIMS )कोरोनाचा उद्रेक झाला आहे. एम्समधील तब्बल 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आता समोर आली आहे. या घटनेने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाटणा एम्सचे वैद्यकीय अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. बिहारमधील पंचायत निवडणुका कोरोनाच्या वाढत्या प्रकरणात पुढे ढकलण्यात आल्या आहेत. निवडणुकीसंदर्भात अधिसूचना एप्रिल अखेर जारी करण्यात येणार होती, पण आता ती पुढे ढकलण्यात आली. साथीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने पंचायत निवडणुका टाळल्या आहेत. आणि 15 दिवसांनंतर पुन्हा परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल व निर्णय घेतला जाईल. बिहारच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे 10,455 नवे रुग्ण सापडले आहेत. या दरम्यान 51 रुग्णांनाही आपला जीव गमवावा लागलाय. म्हणजेच, दर तासाला दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.