नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल चार कोटींवर गेली आहे. कोरोनाचा भयावह वेग पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. रविवारी (1 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 3324 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या चार कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा पाच लाखांवर पोहोचला असून 5,23,843 लोकांना जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर काही जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
देशातील पाच राज्यांमध्ये कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद होत आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. दिल्लीमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यानंतर हरियाणा, केरळ, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचा नंबर लागतो. देशात नव्या रुग्णांपैकी 83.54 टक्के केसेस याच राज्यातील आहेत. तर एकट्या दिल्लीमध्ये 45.73 टक्के नवीन रुग्ण आढळून आले आहेत. भारताचा रिकव्हरी रेट हा 98.74 टक्के आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोविड-19 ची नवीन प्रकरणे सातत्याने समोर येत असली तरी, डॉक्टरांचे म्हणणे आहे की बहुतेक प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे दिसत आहेत, परंतु तरीही लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
फक्त फुफ्फुसांवर नाही तर शरीरातील 'या' अवयवावर अटॅक करतोय कोरोना; 'हे' आहे नवं लक्षण
ANI या वृत्तसंस्थेनुसार, दिल्लीतील अपोलो रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर निखिल मोदी यांनी गेल्या 10 दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असल्याचं म्हटलं आहे. पण बहुतांश घटनांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. डॉ. मोदी म्हणाले की, सध्या, कोविड 19 च्या लक्षणांमध्ये ताप, सर्दी, शिंका येणे, घसा खवखवणे आणि खोकला यासारख्या सौम्य लक्षणांचा समावेश आहे. त्यांनी सांगितलं की, अलीकडे अतिसार (डायरिया) हे कोविड लक्षण म्हणून पाहिलं जात आहे.संसर्ग रोखण्यासाठी सूचना करताना ते म्हणाले की, लोकांनी अनिवार्यपणे मास्क घालणं आवश्यक आहे. ते म्हणाले की, ज्या वेगानं कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यादृष्टीने अधिक खबरदारी घेणं आवश्यक आहे.