नवी दिल्ली - कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जगभरातील रुग्णसंख्येने तब्बल 32 कोटींचा टप्पा पार केला आहे. भारतातही कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होत आहे. वेगाने वाढणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या 24 तासांत 488 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ पुन्हा समोर आला आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (22 जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,37,704 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,88,884 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 21,13,365 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे.
देशातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा देखील दिवसागणिक वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्येने आता दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 10,050 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक रुग्ण असून या राज्यांनी टेन्शन वाढवलं आहे. तर कोरोनाचा वेग वाढला असून देशातील पाच राज्यांनी पुन्हा एकदा प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गुजरात यांचा समावेश आहे. या पाच राज्यांत महाराष्ट्र टॉपवर आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे 48,270 रुग्ण आढळून आले आहेत. यानंतर कर्नाटकात 48,049 रुग्ण, केरळमध्ये 41,668, तामिळनाडूमध्ये 29,870, गुजरातमध्ये 21,225 रुग्ण सापडले आहेत.
देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असतानाच आता एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्येही काही लक्षणं दिसून येत आहेत. जग आता पूर्वीपेक्षा खूप मजबूत स्थितीत असून कोरोनाच्या या व्हेरिएंटशी लढण्यासाठी सज्ज आहे. जगभरातील बहुतेक देशांमध्ये, लोकांना कोरोनावरील लस मिळाली आहे. त्यामुळे लोकांची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात मजबूत झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ओमायक्रॉनची लागण झालेल्या लोकांमध्ये दिसणारी लक्षणंही सौम्य आहेत. कोविडचे वेळोवेळी येणारे नवीन प्रकार पाहता, कोरोना लक्षणांच्या प्रोफाइलमध्येही बदल करण्यात आले आहेत.