नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. चीनमधून वेगाने जगभरात पसरलेल्या कोरोनाचा फटका जवळपास सर्वच देशांना बसला आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता तब्बल 14 कोटींच्या पुढे गेली असून लाखो लोकांना यामुळे जीव गमावला आहे. तर आता कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून पुन्हा एकदा चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 3,46,786 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2,624 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,66,10,481 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1,89,544 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (24 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तीन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दीड कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,89,544 वर पोहोचला आहे.
भयंकर! भयावह!! फक्त 3 दिवसांत तब्बल 1057 मृतदेहांवर अंत्यसंस्कार; दिल्लीत परिस्थिती गंभीर
दिल्लीमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. दिल्लीच्या तीन महानगरपालिकांने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांत तब्बल 1,057 लोकांचे अंत्यसंस्कार (Corona Death In Delhi) करण्यात आले असून हे अत्यंत भयानक आहे. तीन महानगरपालिकांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दिल्लीत 18 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान दररोज अंदाजे 352 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तीन महानगरपालिकांच्या 9 क्षेत्रांत 21 स्मशानभूमी आणि कब्रस्तान आहेत. नगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, 18 एप्रिल रोजी 290 अंत्यसंस्कार (372 अंत्यसंस्कार आणि 17 दफन), 19 एप्रिल रोजी 357 अंत्यसंस्कार (334 अंत्यसंस्कार आणि 23 दफन) आणि 20 एप्रिल रोजी 410 अंतिम संस्कार (391 अंत्यसंस्कार आणि 19 दफन) केले गेले आहे.
मोठा हलगर्जीपणा! धावत्या वाहनातून रस्त्यावर पडला कोरोनाग्रस्ताचा मृतदेह अन्...
कोरोनाच्या संकटात अनेक ठिकाणी प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येत असतानच या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. कोरोना रुग्णाचा मृतदेह हा धावत्या वाहनातून रस्त्यावर पडल्याची भयंकर घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील विदिशा मेडिकल कॉलेजमधील हलगर्जीपणाची आणखी एक घटना समोर आली आहे. शव घेऊन जाणाऱ्या वाहनातून कोरोनाग्रस्ताचा मृतदेह हा भर रस्त्यात पडला. लोकांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी मोठमोठ्याने आवाज देऊन वाहन थांबवलं. त्यानंतर तो पुन्हा उचलून वाहनात ठेवण्यात आला आणि अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.