नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. चीनमधून वेगाने जगभरात पसरलेल्या कोरोनाचा फटका जवळपास सर्वच देशांना बसला आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता तब्बल 15 कोटींच्या पुढे गेली असून लाखो लोकांना यामुळे जीव गमावला आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे देशातील परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ समोर आला आहे. रुग्णसंख्येत सातत्याने मोठी वाढ होत असल्याने कडक लॉकडाऊनचे संकेत मिळत आहेत.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 3,82,315 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,780 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 2,06,65,148 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2,26,188 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (5 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3 लाख 82 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दोन लाखांवर पोहोचला आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 34,87,229 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,69,51,731 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. स्मशानभूमीबाहेर अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या आहे. हे असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतही जागा मिळत नसल्याचं भीषण वास्तव आता समोर आलं आहे. कोरोनामुळे दिवसागणिक परिस्थिती भयंकर होत आहे. कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यात अनेक ठिकाणी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानात जागाही शिल्लक राहिलेली नाही.
भीषण, भयंकर, भयावह! 'या' शहरात कोरोनाचा हाहाकार; स्मशानभूमीबाहेर लागला 'हाऊस फुल्ल'चा बोर्ड
कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार होण्यासाठी बरेच दिवस वाट पाहावी लागत आहे. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह हे वेटिंग लिस्टवर ठेवण्यात आले आहेत. याच दरम्यान बंगळुरूमध्ये देखील भयावह घटना समोर आली आहे. कर्नाटकमधील बंगळुरूच्या चामराजपेटमधील एका स्मशानभूमीबाहेर चक्क "हाऊस फुल्ल"चा बोर्ड लावण्यात आला आहे. कोरोनामुळे अचानक मृतांच्या संख्येत वाढ झाली असून, स्मशानभूमीत मोठ्या संख्येनं मृतदेह आणले जात आहेत. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने बोर्ड लावण्यात आला आहे. स्मशानभूमीत 20 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी नवीन मृतदेह घेण्यास नकार दिला जात आहे. बंगळुरूमध्ये अशा 13 स्मशानभूमी आहेत, जिथे विद्युत शवदाहिन्या आहेत. मात्र कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर आणि मृतांची संख्या वाढल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अंत्यसंस्कारासाठी बराच वेळ वाट पाहावी लागत आहेत.