नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक देशांत कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत होता. तसेच देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा आकडा हा गेल्या काही दिवसांच्या तुलनेत थोडा वाढला आहे. त्यामुळे काही ठिकाणी परिस्थिती चिंताजनक आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 38,667 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 478 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत 4,30,732 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (14 ऑगस्ट) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 38 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा चार लाखांवर पोहोचला आहे. तसेच देशाचा पॉझिटिव्ही रेट 2.05 टक्क्यांवर आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 3,87,673 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3,13,38,088 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशात आतापर्यंत तब्बल 53.61 कोटी लोकांचं कोरोना लसीकरण करण्यात आलं आहे. याच दरम्यान कोरोनाबाबत चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. चेन्नईमध्ये एक धार्मिक कार्यक्रम हा कोरोनाचा "सुपर स्प्रेडर" ठरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. यामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान चेन्नईतील एका मंदिर उत्सवात भाग घेतलेले 20 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. या धार्मिक कार्यक्रमात जवळपास 300 लोक सहभागी झाले होते. यापैकी 47 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
परिस्थिती गंभीर! धार्मिक कार्यक्रम ठरला कोरोनाचा 'सुपर स्प्रेडर'; 20 जण पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू
कोरोनाचा वेगाने होणारा संसर्ग लक्षात घेता प्रशासनाने कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व लोकांवर नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशन (GSS) ने देखील पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व लोकांचे नमुने 7, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी घेण्यात आले होते आणि काही दिवसात पुन्हा नमुने घेतील. अहवालांनुसार संक्रमित लोकांची प्रकृती सध्या ठीक आहे. त्याच्यावर ईएसआय, केएमसी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.