नवी दिल्ली - कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जगभरातील रुग्णसंख्येने तब्बल 53 कोटींचा टप्पा पार केला आहे. भारतातही कोरोनाचा पुन्हा एकदा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वेगाने वाढणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चार हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.
कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ समोर आला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या चार कोटींवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. रविवारी (5 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,270 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 5,24,692 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेकांवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
देशातील कोट्यवधी लोकांनी कोरोनावर मात केली असून अनेकांनी लस देखील घेतली आहे. मात्र आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मास्क लावण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ दिसत आहे. कोरोनाचा स्फोट पुन्हा होऊ नये म्हणून खबरदारी ही बाळगायलाच हवी. त्यासाठी मास्कचा वापर करायला हवा असे मत टास्क फोर्स तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
आरोग्य विभागाने वेळीच खबरदारी घेत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. मास्क घालणे ऐच्छिक असले, तरी कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी सिनेमागृहे, सभागृहे, कार्यालयांमधील बंदिस्त ठिकाणी, तसेच सार्वजनिक ठिकाणांवर मास्क घालणे आवश्यक आहे. त्याच वेळी, कोरोना चाचण्यांची संख्या कमी झाल्याने ती वाढवावी. हे प्रमाण सध्या असलेल्या चाचण्यांपेक्षा दुप्पट करावे, अशा सूचनाही आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
राज्य कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले, वाढत्या कोरोना संसर्गावर तज्ज्ञांचे बारकाईने लक्ष आहे. वाढता संसर्ग आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिजोखमीच्या गटातील व्यक्तींनी अधिक काळजी घेतली पाहिजे. त्यात गर्भवती, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. याखेरीज, कोरोना गेला ही मानसिकता बदलून मास्कचा वापर, गर्दीत वावर कमी, स्वच्छतेचे निकष आणि शारीरिक अंतर हे नियम पाळले पाहिजेत. शिवाय, लसीकरणाकडे दुर्लक्ष न करता वर्धक मात्रासुद्धा घेतली पाहिजे.