नवी दिल्ली - जगात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र कोरोना मृतांचा आकडा हा गेल्या काही दिवसांच्या तुलनेत थोडा वाढला आहे. त्यामुळे काही ठिकाणी परिस्थिती चिंताजनक आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 42,766 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,206 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 3,07,95,716 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 4,07,145 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (10 जुलै) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 42 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा चार लाखांवर पोहोचला आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 4,55,033 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 2,99,33,538 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोना रुग्णांना आता Bell's Palsy चा धोका असल्याचं समोर आलं आहे. यामुळे पुन्हा एकदा लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बेल्स पाल्सी म्हणजे चेहऱ्याला लकवा मारणं. कोरोना रुग्णांमध्ये याचा सातपट अधिक धोका असल्याची माहिती मिळत आहे. युनिव्हर्सिटी हॉस्पिटल क्लीव्हलँड मेडिकल सेंटर आणि केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन या संस्थांमधल्या शास्त्रज्ञांनी एक नवा रिसर्च केला आहे.
संकटं संपता संपेना! कोरोनानंतर Bell's Palsy चा सर्वाधिक धोका; 'ही' लक्षणं आढळल्यास वेळीच व्हा सावध
कोरोनाच्या एक लाख रुग्णांपैकी 82 जणांना बेल्स पाल्सी विकार झाल्याचं रिसर्चमध्ये आढळलं. तर कोरोना लस घेतलेल्या एक लाख लोकांपैकी फक्त 19 जणांना हा त्रास झाला. बेल्स पाल्सीपासून बचाव करण्यासाठी लस घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बेल्स पाल्सी हा शरीरातल्या स्नायूंशी निगडित असलेला अर्धांगवायूसदृश (Paralysis) विकार आहे. अर्धांगवायूमध्ये अर्धं शरीर निकामी होतं. बेल्स पाल्सीमध्ये चेहऱ्याच्या एका बाजूवर वाईट परिणाम होतो. रुग्णाला यामध्ये गाल फुगवण्यास, गालाची हालचाल करण्यास त्रास होतो. याचा डोळ्यांच्या पापण्यांवर आणि भुवयांवरही परिणाम होतो. डोळ्यांच्या पापण्या मिटलेल्या राहतात. हा विकार होण्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हा त्रास उद्भवल्यावर दोन महिन्यांत यावर योग्य उपचार करण्यात आले, तर हा विकार लवकर बरा होऊ शकतो. यातून बाहेर येण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधीही लागू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.