नवी दिल्ली - कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जगभरातील रुग्णसंख्येने तब्बल 21 कोटींचा टप्पा पार केला आहे. भारतातही कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होत आहे. वेगाने वाढणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 46 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या 24 तासांत 509 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ पुन्हा समोर आला आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (28 ऑगस्ट) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 46,759 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3,26,49,947पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,37,370 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 3,59,775 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3,18,52,802 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे.
देशात शुक्रवारी कोरोना लसीकरणाचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. सरकारनं सांगितल्यानुसार, भारतात 93 लाखांहून अधिक लोकांना लस देण्यात आल्या आहेत. लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून एका दिवसांत करण्यात आलेली ही सर्वाधिक संख्या आहे. दरम्यान, देशातील एकून लसीकरणाचा आकडा 62 कोटींच्या पुढे गेला आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. केरळमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची सर्वाधिक संख्या ही केरळमध्ये आहे. तर देशात फक्त दोन दिवसांत नव्या रुग्णांची संख्या ही दुप्पट झाली आहे.
धोका वाढला! लक्षणं दिसण्याआधीच डेल्टा रुग्णांपासून होतोय कोरोनाचा वेगाने प्रसार; रिसर्चमधून दावा
कोरोनावर संशोधन सुरू असून संशोधनातून नवनवीन माहिती ही सातत्याने समोर येत आहे. अशीच पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. लक्षणं दिसण्याआधीच डेल्टा रुग्णांपासून कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंट अधिक संक्रमक असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता डेल्टाचं 74 टक्के संक्रमण हे लक्षणं दिसण्याआधीच झाल्याचं समोर आलं आहे. एका रिसर्चमधून हा दावा करण्यात आला आहे. हाँगकाँग युनिव्हर्सिटीचे एपिडेमोलाजिस्ट बेंजामिन काउलिंग यांनी अशा परिस्थितीत कोरोनाचं संक्रमण रोखणं अत्यंत कठीण असल्याचं म्हटलं आहे. याच कारणामुळे अनेक देशात कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. संशोधकांनी मे-जून दरम्यान 101 लोकांची तपासणी करण्यात आली होती. डेल्टा संक्रमित असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणं दिसण्यासाठी लागणारा वेळ हा 5.8 दिवसांचा होता. मात्र त्याआधीच कोरोनाचा प्रसार होत होता. रिसर्चमधून ज्या लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे त्यांना देखील डेल्टा व्हेरिएंटची लागण झाल्याचं समोर आलं असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.