नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 40 कोटींच्या वर गेली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 50,407 नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (12 फेब्रुवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 50,407 नवे रुग्ण आढळून आले आहेत. रिकव्हरी रेट हा 97.37 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 6,10,443 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने आता कोरोनाच्या संकटात एक धोक्याचा इशारा दिला आहे. अल्फा, बीटा, गामा, डेल्टा, ओमायक्रॉननंतर आता कोरोनाचा पुढचा व्हेरिएंट हा अधिक संसर्गजन्य असू शकतो असं म्हटलं आहे. डब्ल्यूएचओच्या डॉ. मारिया वान केरखोव यांनी कोरोना अद्याप गेलेला नाही. त्याचा नवीन व्हेरिएंट आणखी संसर्गजन्य असेल, कारण तो इतर व्हेरिएंटना मागे टाकेल. हा सौम्य आणि गंभीर दोन्ही असू शकतो आणि आपली प्रतिकारशक्ती कमी करू शकतो असं म्हटलं आहे. कोणत्याही व्हायरसमध्ये कालांतराने बदल होतात, ज्यामुळे तो निसर्गात टिकून राहू शकतो. बहुतेक व्हायरस त्यांच्या गुणधर्मांमध्ये फारसा बदल करत नाहीत, परंतु काही व्हायरस आहेत ज्यात लस आणि उपचारांशी लढा दिल्याने ते बदलतात.
आतापर्यंत 5 व्हेरिएंट्स आहे. यामध्ये अल्फा, बीटा, गामा, डेल्टा आणि ओमायक्रॉन VoC घोषित केले गेले आहेत. ते माणसांमध्ये त्यांच्या वेगाने प्रसारासाठी, त्यांना गंभीरपणे संक्रमित करण्यासाठी आणि त्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत. अल्फा व्हेरिएंट (B.1.1.7) सर्वप्रथम सप्टेंबर 2020 मध्ये ब्रिटनमध्ये आढळून आला. बीटा व्हेरिएंट (B.1.351) प्रथम दक्षिण आफ्रिकेने मे 2020 मध्ये शोधला होता. गामा व्हेरिएंट (P.1) नोव्हेंबर 2020 मध्ये ब्राझीलमध्ये आढळला. नेचर जर्नलमधील अहवालानुसार, या तिन्ही व्हेरिएंटमध्ये काही म्य़ूटेशन समान आहेत. ते खराब प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना लक्ष्य करतात आणि त्यांचा संसर्ग काही महिने टिकू शकतो.