नवी दिल्ली - देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून, परिस्थितीची वाटचाल वाईटाकडून अतिवाईटाकडे सुरू आहे, अशा परिस्थितीत देशातील कोणत्याही भागाने गाफील राहून चालणार नाही, असे सांगत केंद्र सरकारने देशातील कोरोनास्थितीने गंभीर वळण घेतले असल्याचे चित्र मंगळवारी उभे केले. त्यातही महाराष्ट्राची स्थिती अधिकच चिंताजनक आहे. याच दरम्यान आता पुन्हा एकदा कोरोनाची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 53,480 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 354 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,21,49,335 वर पोहोचली आहे.
कोरोनामुळे देशात 1,62,468 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (31 मार्च) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 53 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 354 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तब्बल 104 दिवसांनी मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. याआधी 16 डिसेंबर रोजी 356 जणांचा मृत्यू झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे मंगळवारी फक्त महाराष्ट्रात 139 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सलग सहाव्या दिवशी राज्यातील मृतांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती मिळत आहे.
आनंदाची बातमी! देशातील तब्बल 430 जिल्ह्यांत गेल्या 28 दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण नाही
देशात कोरोनाचा विस्फोट होत असताना सुखावणारी आकडेवारी आता समोर आली आहे. देशातील तब्बल 430 जिल्ह्यांत गेल्या 28 दिवसांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नसल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाच्या संकटात यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. काही राज्यात कोरोनाचा उद्रेक होत असताना देशात असे देखील काही जिल्हे आहेत. जिथे परिस्थितीत सुधारणा होत असून रुग्णांचे प्रमाण घटत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशात गेल्या 28 दिवसांत तब्बल 430 जिल्ह्यांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नसल्याचं म्हटलं आहे. देशात कोरोनाबाबत स्थिती सध्यातरी नियंत्रणात आहे. परिस्थिती नियंत्रणात असली तरी नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. निष्काळजीपणा घातक ठरू शकतो. यामुळे संसर्ग वाढू शकतो. कोरोनाची नियमावली पाळा देखील आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
कोरोनास्थिती अतिवाईटाकडे, संपूर्ण देशालाच जोखीम, महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक
देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दीड लाखांवर पोहोचला आहे. देशात कोरोना संसर्गाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि निती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांनी मंगळवारी नवी दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद घेत देशापुढील कोरोनास्थितीचे संकट विशद केले. देशातील काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, बाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याचे आढळून येत आहे, असे पॉल यांनी यावेळी नमूद केले. देशातील सर्वाधिक बाधितांची संख्या असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातील असून, तेथील परिस्थिती अधिकच चिंताजनक असल्याचे पॉल म्हणाले. रुग्णालयांना सुसज्ज राहण्याचे आदेशही त्यांनी दिले. देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचेही पॉल यांनी नमूद केले.