नवी दिल्ली - संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 12 कोटींचा टप्पा पार केला आहे. लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे देशातही कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल एक कोटीवर गेला आहे. तर कोरोना बळींची संख्या दीड लाख झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी (30 मार्च) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 56,211 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 271 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,20,95,855 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,62,114 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 5,40,720 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,13,93,021 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशात कोरोनाचा धोका वाढला असून गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.
बापरे! 1 कोरोना रुग्ण तब्बल 406 जणांना करू शकतो संक्रमित; दुसरी लाट धोकादायक, प्रशासनाच्या चिंतेत भर
देशात कोरोना संसर्गाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा संसर्ग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत मे 2020 पेक्षा आता वाढ होत आहे. एक कोरोना संक्रमित व्यक्ती कोणत्याही निर्बंधाशिवाय 30 दिवसांत सरासरी 406 लोकांना संक्रमित करू शकतो. मे 2020 नंतर कोरोनाचा संसर्ग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या साप्ताहिक घटनांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. केंद्र सरकारने 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची कोरोनासंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. त्याअंतर्गत राज्यांमधील कोरोना तपासणीची संख्या वेगाने वाढविण्यासाठी आणि कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी कडक कारवाई करण्यास सांगितले गेले आहे.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अशा 46 जिल्ह्यांकडे अधिक लक्ष देण्यात आले आहे ज्यात या महिन्यात संक्रमणाच्या एकूण प्रकरणांपैकी 71% आणि या प्रकरणांमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या 69% टक्के नोंदविण्यात आली आहेत. आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव अधिक आहे. देशात मागील एका आठवड्यात आढळून आलेल्या प्रकरणांपैकी 59.8 टक्के रुग्ण याच जिल्ह्यांमधील आहेत असं म्हटलं आहे. महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, तामिळनाडू, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, जम्मू कश्मीर, कर्नाटक, पंजाब आणि बिहार या राज्यांसाठी आणि केंद्र शासित प्रदेशांची बैठक घेण्यात आली.