नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल तीन कोटींवर गेली आहे. कोरोनाचा सुस्साट वेग सध्या पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा देखील वाढत असून एकूण रुग्णसंख्येने दोन हजारांचा टप्पा पार केला आहे.
देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 2135 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये धोका निर्माण झाला आहे. ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये आहेत. महाराष्ट्रात 653 तर दिल्लीमध्ये 464 रुग्ण आढळून आले आहेत. तर 2135 रुग्णांपैकी 828 रुग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत. केरळ, राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, हरियाणा, ओ़डिशा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहायला मिळत आहे. 50 हजारांहून जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली असून धडकी भरवणारा ग्राफ समोर आला आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,82,551 वर
गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. बुधवारी (5 जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 58,097 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 534 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,82,551 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 2,14,004 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3,43,21,803 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे.
'आठवड्याभरात बरे होताहेत ओमायक्रॉनचे 99 टक्के रुग्ण पण...'; तज्ज्ञांचा दावा
आठवड्याभरात ओमायक्रॉनचे 99 टक्के रुग्ण हे बरे होत आहेत. डॉक्टरांनी याबाबच माहिती दिली असून रिसर्चमध्ये खुलासा करण्यात आला आहे. डॉ. सुरेश कुमार यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, ओमायक्रॉनची लागण झालेले जवळपास 99 टक्के रुग्ण हे आठवड्य़ाभरात ठीक झाले आहेत. हा व्हेरिएंट अत्यंत वेगाने पसरतो पण डेल्टाच्या तुलनेत शरीरातून लवकर निघून जातो. डेल्टा प्रकारामुळे उद्भवलेल्या कोरोनातून बरं होण्यासाठी 7 ते 10 दिवस लागतात. तर काही रुग्णांना या आजारातून बरे होण्यासाठी जास्त वेळ लागला. काही डेल्टा रुग्ण दोन महिन्यांनंतर निगेटिव्ह होत होते. आकडेवारीनुसार, Omicron प्रकाराच्या बाबतीत, 92% रुग्णांची RT-PCR चाचणी एका आठवड्यात निगेटिव्ह येत आहे. त्याच वेळी, 5% रुग्ण आठव्या दिवशी तर 3% रुग्ण नवव्या दिवशी निगेटिव्ह आढळले आहेत.