नवी दिल्ली - देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला असून कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,77,031 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र कोरोनाच्या संकटात सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. तब्बल 75 दिवसांनी पहिल्यांदाच कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झालेली पाहायला मिळाली आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वेग हा थोडा मंदावताना दिसत आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 60,471 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2726 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,95,70,881 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 3,77,031 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (15 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 60 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा तीन लाखांवर पोहोचला आहे.
भारीच! ड्रोनद्वारे देशातील दुर्गम भागात पोहोचवण्यात येणार 'कोरोना लस'; जाणून घ्या, सरकारचा प्लॅन
देशातील अधिकाधिक लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्यासाठी सरकार सर्वोतोपरीचे प्रयत्न करत आहे. याच दरम्यान लसीकरण मोहीम दुर्गम भागात सहज उपलब्ध करुन देण्याच्या योजनेवरही आता सरकार काम करत आहे. सरकारकडून आता देशातील दुर्गम भागात, जिथे पोहचणं कठीण आहे, अशा ठिकाणी ड्रोनच्या (Drones) मदतीने कोरोना लस (Corona Vaccine) देण्याची योजना आखली जात आहे. आयआयटी कानपूरकडून करण्यात आलेल्या एका संशोधनात हे सांगण्यात आलं आहे. सध्या देशात कोरोना लस खरेदी करण्याचं काम सरकारी कंपनी एचएचएल (HLL) लाइफकेअर (HLL Lifecare) करत आहे. याची सहाय्यक कंपनी एचएचएल इंफ्रा टेक सर्विसेज लिमिटेडने (HLL Infra Tech Services Limited) इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून (ICMR) देशातील दुर्गम भागात कोरोना लस पोहोचवण्यासाठी 11 जून रोजी निविदा मागवण्यात आल्या आहेत.
बापरे! लसीच्या ट्रायलआधीच 50% लहान मुलं निघाली कोरोना संक्रमित; रिपोर्टमधून धडकी भरवणारा खुलासा
कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असतानाच एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. एका रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. कोरोना लसीच्या ट्रायलआधीच 50% लहान मुलं कोरोना संक्रमित असल्याची माहिती समोर आली आहे, लहान मुलांना लवकरात लवकर लस देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. देशात चिमुकल्यांवर कोरोना लसीची ट्रायल सुरू होणार आहे. पण त्याआधीच याआधीच एम्सने (AIIMS) एक धक्कादायक खुलासा केला आहे. एम्समध्ये ज्या लहान मुलांवर कोरोना लसीच्या ट्रायलआधी अशी चाचणी घेण्यात आली. त्यापैकी बहुतेक मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, अशी माहिती आता स्क्रिनिंगमधून समोर आली. मुलांच्या पालकांनाही मुलांना कोरोना झाल्याची कल्पना नव्हती. या सर्व मुलांमध्ये मोठ्या लोकांप्रमाणे श्वास घेण्यास त्रास, फुफ्फुसात संसर्ग, घशात संसर्ग यासारखी कोरोनाची गंभीर लक्षणं नव्हती. तर केवळ सर्दी, खोकला आणि ताप आला होता, असंही या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.