नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा जगभरात उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 12 कोटींच्या वर गेली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्येने एक कोटीचा टप्पा पार केला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना पुन्हा एकदा धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे.
गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. शनिवारी (27 मार्च) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 62,258 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 291 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,19,08,910 पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,61,240 वर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 4,52,647 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,12,95,023 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या गाईडलाईन्स 1 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत लागू होणार आहेत.
चिंता वाढली! देशात रुग्ण दुप्पट होण्याचा काळ 504 दिवसांवरून 202 वर; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ
देशात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी हा 504.4 दिवसांवरून 202.3 दिवसांवर आला आहे. 1 मार्चला हा कालावधी 504 दिवस होता तो आता 23 मार्चला तो 202 दिवस झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सहा राज्यांत दैनंदिन रुग्णांचे प्रमाण वाढले असून त्यांचे प्रमाण एकूण देशातील प्रमाणाच्या 80.90 टक्के आहे. 22 मार्चला 32.53 लाखांहून अधिक लोकांनी लसीचा डोस देण्यात आला आहे. एकाच दिवसातील ही सर्वांत मोठी संख्या आहे. महाराष्ट्रानंतर पंजाबमध्ये 2,299 रुग्ण असून गुजरातेत 1,640 रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, तमिळनाडू, छत्तीसगड, कर्नाटक , हरियाणा व राजस्थान या राज्यात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. फेब्रुवारीच्या मध्यावधीत भारतात नीचांकी रुग्ण संख्या होती.