नवी दिल्ली - देशात कोरोनाचा धोका हा दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून पुन्हा एकदा धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येने रेकॉर्ड मोडला आहे. देशात शनिवारी कोरोनाचे तब्बल 62,714 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 312 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील रुग्णसंख्येने एक कोटीचा टप्पा पार केला आहे. एकूण रुग्णांची संख्या 1,19,71,624 वर पोहोचली आहे. तर देशात कोरोनामुळे आतापर्यंत 1,61,552 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असताना कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
बापरे! 1 कोरोना रुग्ण तब्बल 406 जणांना करू शकतो संक्रमित; दुसरी लाट धोकादायक, प्रशासनाच्या चिंतेत भर
देशात कोरोना संसर्गाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा संसर्ग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत मे 2020 पेक्षा आता वाढ होत आहे. एक कोरोना संक्रमित व्यक्ती कोणत्याही निर्बंधाशिवाय 30 दिवसांत सरासरी 406 लोकांना संक्रमित करू शकतो. मे 2020 नंतर कोरोनाचा संसर्ग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या साप्ताहिक घटनांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. केंद्र सरकारने 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची कोरोनासंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. त्याअंतर्गत राज्यांमधील कोरोना तपासणीची संख्या वेगाने वाढविण्यासाठी आणि कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी कडक कारवाई करण्यास सांगितले गेले आहे.
आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव अधिक आहे. देशात मागील एका आठवड्यात आढळून आलेल्या प्रकरणांपैकी 59.8 टक्के रुग्ण याच जिल्ह्यांमधील आहेत असं म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली 12 राज्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव (आरोग्य व कुटुंब कल्याण) तसंच सर्वाधिक कोरोना रुग्ण आणि मृत्यू नोंदवल्या गेलेल्या 46 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांची उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत प्रभावित जिल्ह्यांतील स्थितीचा आढावा घेण्यात आला. यानुसार जवळपास 90% मृत्यू हे 45 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्यांचे झाले आहेत. यात असंही समोर आलं आहे, की 90% लोकांना संसर्गाबद्दलची माहिती असतानाही मास्क केवळ 44% लोकच वापरतात.