नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 44 कोटींचा टप्पा पार केला आहे. एकूण रुग्णांची संख्या 440,648,082 वर पोहोचली आहे. तर 5,993,066 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतामध्ये देखील काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा आकडा केला आहे. असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 6,561 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 142 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 4,29,45,160 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. गुरुवारी (3 मार्च) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे सहा हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 4,29,45,160 वर पोहोचली. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 77,152 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे 5,14,388 जणांनी आपला जीव गमावला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून मृत्युदरही कमी झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय जाहीर केला. त्यानुसार, 14 जिल्ह्यात निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले असून नाट्यगृह आणि सिनेमागृह 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये आणखी एक गुडन्यूज म्हणजे राज्यात कोरोनामुळे बुधवारी एकही रुग्ण दगावला नसल्याची नोंद झाली आहे. कोरोनाबाधित सक्रिय रूग्णांची दिवसेंदिवस कमी होताना आकडेवारीतून दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू होण्याची सुरूवात झाल्यापासून पुणे शहरात तब्बल वीस महिन्यांनतर तीन अपवाद वगळता प्रथमच कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसल्याचे वृत्त समोर आले होते. स्वत: महपौर मुरलीधर मोहोळ यांनी यांसदर्भात ट्विट करुन माहिती दिली होती.
राज्यात बुधवारी कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यात 544 नवीन रुग्णांचे निदान झाले असून रिकव्हरी रेट 98.05 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के एवढा असून एकही मृत्यू झाला नाही. राज्यात 1 एप्रिल 2020 नंतर हा पहिला दिवस आहे, ज्यादिवशी कोरोनामुळे एकही मृत्यू नाही. म्हणजेच तब्बल 23 महिन्यानंतर हा दिवस पाहायला मिळाला आहे. त्यामुळे, आता कोरोना आटोक्यात आला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.