नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन आणि आयसोलेशनच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. देशभरात योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून काही ठिकाणी कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. मात्र याच दरम्यान अनेकदा नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ देखील होत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. असं असताना आता थोडा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे साडे सहा हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या चार कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (14 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6,594 नवे रुग्ण आढळून आले आहेत. रिकव्हरी रेट 98.67 टक्क्यांवर पोहोचला आहे. डेली पॉझिटिव्हिटी रेट 2.05 टक्के तर वीकली पॉझिटिव्हिटी रेट 2.32 टक्के झाला आहे.
देशात वाढणाऱ्या कोरोना संक्रमणामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी चर्चा केली. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे लसीकरण वाढवण्याचं आवाहन त्यांनी केले. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी सांगितले की, कोरोना संक्रमण अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. अशावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचे लसीकरण वाढवलं पाहिजे. त्याचसोबत वृद्धांना बूस्टर डोस देण्यावरही विशेष लक्ष ठेवले पाहिजे. कोरोना व्हायरसच्या विविध व्हेरिएंटची ओळख पटवण्यासाठी जीनोम सीक्वेसिंगही वाढवलं पाहिजे.
सोमवारी आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यातील कोरोना संक्रमणाचाही बैठकीत आढावा घेतला. कोरोनाचा धोका टळला नाही. काही राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता सरकारनं सतर्क राहणं गरजेचे आहे. कोविड नियमांचे पालनही करावे. मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे याचीही जनजागृती लोकांमध्ये करायला हवी. काही राज्यात सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णात वाढ होताना दिसत आहे. त्याचसोबत जिल्हा आणि राज्यात कोविड 19 टेस्टिंग कमी झाल्याचं दिसून आले. कोरोना चाचणीत वाढ करावी अशा सूचना केंद्राने सर्व राज्यांना दिल्या आहेत.