नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 12 कोटींच्या वर गेली आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतच्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्येने एक कोटीचा टप्पा पार केला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना धडकी भरवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर येत आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने चिंतेत भर पडत आहे.
गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने गेल्या काही महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. शुक्रवारी (2 एप्रिल)केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 81,466 नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,23,03,131 वर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,63,396 वर पोहोचला आहे. रिपोर्टनुसार, देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ही 6,14,696 आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत दीड लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर या संकटात दिलासादायक बाब म्हणजे 1,15,25,039 लोकांनी कोरोनावर मात केली असून ही लढाई जिंकली आहे.
महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचं हे संकट असतानाच आता राज्यासमोर अजून एक संकट उभं राहिलं आहे. मुंबईसह राज्यात पुढील 5 ते 6 दिवस पुरेल एवढाचा रक्ताचा साठा (Blood) शिल्लक असल्याची आता माहिती मिळत आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) यांनी दिली आहे. यासोबतच त्यांनी नागरिकांना रक्तदानासाठी पुढे येण्याचं आवाहनही देखील केलं आहे.
राजेंद्र शिंगणे यांनी मुंबईसह राज्यातील रक्तसाठ्याचा आढावा घेतला. त्यानंतर याबाबत माहिती दिली आहे. "मुंबईसह राज्यात पुढील 5 ते 6 दिवस पुरेल एवढा तर जास्तीत जास्त दहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे महत्त्वाच्या शस्त्रक्रियांवेळी रुग्णांना रक्ताची अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करावं. रुग्णालये आणि विविध सामाजिक संघटनांनीही पुढाकार घेत रक्तदान शिबिरे आयोजित करावीत" असं आवाहन शिंगणे यांनी केलं आहे.
कोरोनाच्या संकटात "या" राज्याने घेतला मोठा निर्णय; पहिली ते आठवीची शाळा 15 एप्रिलपर्यंत बंद
कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने एका राज्याने मोठा निर्णय घेतला आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा ही 15 एप्रिलपर्यंत बंद असणार आहे. मध्य प्रदेश सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पहिली ते इयत्ता आठवी पर्यंतच्या सरकारी आणि खासगी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी मध्य प्रदेशमध्ये 31 मार्च 2021 पर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या ही वेगाने वाढत आहे. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता मध्य प्रदेशच्या शिक्षण विभागाने 1 ली ते 8 वीपर्यंतची शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.