नवी दिल्ली - जगात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 70 दिवसांतील नीचांक आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 84,332 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4,002 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,93,59,155 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 3,67,081 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (12 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 84 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा तीन लाखांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 10,80,690 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 2,79,11,384 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. याच दरम्यान कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतरही वाढवण्यात आलं आहे. याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अशातच आता मागील काही रिसर्चचा हवाला देत मीडिया रिपोर्ट्सचं असं म्हणणं आहे, की कोरोनाचे निरनिराळे व्हेरियंट समोर आल्यानंतर आता कोविशिल्डच्या दोन्ही डोसमधील अंतर कमी करणं योग्य ठरेल. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, कोविशिल्डच्या दोन्ही डोसमधील अंतरात तातडीने कोणत्याही बदलाची गरज नाही. कोणालाही या बाबतीत घाबरण्याची गरज नाही. सध्या दोन्ही डोसमधील अंतरात बदल करण्याची गरज पडल्यासही हा निर्णय अत्यंत सावधगिरीनं घेतला जाईल. आपण हे लक्षात ठेवायला हवं, की जेव्हा आपण अंतर वाढवलं, तेव्हा आपल्याला त्या लोकांसाठीच्या धोक्याचा विचार करायचा होता, ज्यांनी केवळ एकच डोस घेतला आहे.
Covishield च्या दोन डोसमधील अंतर बदलणं किती गरजेचं?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
अंतर वाढवण्यामागे मात्र असा उद्देश होता, की अधिकाधिक लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळू शकेल आणि कोरोनाविरोधातील लढ्यात थोडी अधिक मदत मिळेल असं देखील पॉल यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटामध्ये (NTAGI) अशा लोकांचा समावेश आहे जे जागतिक आरोग्य संघटेनच्या पॅनलचा आणि समितीचा हिस्सा होते. याच गटाने लसीच्या दोन डोसमधील अंतराबाबत निर्णय घेणं योग्य ठरेल. पॉल यांनी सुरुवातीला यूकेनं 12 आठवड्यांचं अंतर ठेवलं होतं. मात्र, आपल्याकडे उपलब्ध आकड्यांनुसार आपल्याला त्यावेळी हे सुरक्षित वाटलं नव्हतं. त्यामुळे, याबाबत कोणताही निर्णय शास्त्रज्ञांकडे सोपवणं आणि त्यांच्या निर्णयाचा आदर करणंच योग्य राहील असं म्हटलं आहे.