नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जगात कोरोनाचे थैमान पाहायला मिळत आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. पण दुसरीकडे कोरोना मृतांचा आकडा मात्र वाढताना दिसत आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 2,55,874 नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (25 जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2 लाख 55 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे देशभरात 4,90,462 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 22,36,842 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
एका व्यक्तीला कितीवेळा होऊ शकते ओमायक्रॉनची लागण?
ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान चिंता वाढवणारी आणखी एक घटना समोर आली आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक वेगाने या प्रकारामुळे रुग्ण बाधित होत आहेत. ओमायक्रॉन हा एक असा व्हेरिएंट आहे जो अँटीबॉडीजला चकमा देतो. मग त्या अँटीबॉडीज लसीकरणामुळे तयार झालेल्या असोत किंवा जुन्या कोरोना संसर्गामुळे तयार झालेल्या असोत याची लागण पुन्हा होऊ शकते. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत एकाच व्यक्तीला दोनदा कोरोना संसर्ग झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली होती. अशी अनेक प्रकरणे होती ज्यात एकाच व्यक्तीला दोनदा डेल्टा संसर्ग झाला होता. त्यामुळे आताही असा प्रश्न विचारला जात आहे, की ओमायक्रॉन प्रकार एखाद्या व्यक्तीला किती वेळा संक्रमित करू शकतो.
रिसर्चनुसार, ओमायक्रॉनमध्ये पुन्हा संसर्ग होण्याचा धोका डेल्टा प्रकारापेक्षा 4 पट जास्त आहे. अशा परिस्थितीत एकाच व्यक्तीला 2 वेळा ओमायक्रॉनचा संसर्ग होण्याची शक्यता सहज निर्माण होते. आपल्या शरीरात अँटीबॉडीज असतानाही ओमायक्रॉनची लागण होऊ शकते. त्यामुळे ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत किंवा त्यांना आधीच कोरोना किंवा ओमायक्रॉनची लागण झाली आहे, अशा लोकांनाही सहज संसर्ग होत आहे. ओमायक्रॉन टाळण्यासाठी महत्त्वाच्या कामासाठीच फक्त घराबाहेर पडावे. बाहेर पडताना डबल मास्क वापरा. हात वारंवार स्वच्छ करावेत. अन्नपदार्थ खाण्यापूर्वी हात साबणाने चांगले धुवा. आपले डोळे, तोंड किंवा चेहऱ्याला बाहेर असताना हात स्वच्छ केल्याशिवाय स्पर्श करू नका.