नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल तीन कोटीवर गेली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग थोडा मंदावला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत होती. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. असं असताना दुसरीकडे मृतांचा आकडा सतत वाढत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोना मृतांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. मंगळवारी (1 फेब्रुवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 1,67,059 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1192 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा चार लाख 90 हजारांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 17,43,059 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर काही जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रिकव्हरी रेट 94.6 टक्क्यांवर आहे. सलग चौथ्या दिवशी कोरोना मृतांची संख्या वाढली आहे.
देशामध्ये सोमवारी 959, रविवारी 893, शनिवारी 871 रुग्णांनी जीव गमावला. केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक या पाच राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तब्बल 1,66,68,48,204 लोकांचं लसीकरण झालं आहे. कोरोना लसीकरणाबाबत आता एक महत्त्वाची माहिती समोर आली असून सरकारने मोठा खुलासा केला आहे. लस न घेणाऱ्यांसाठी कोरोना 'काळ' ठरत असल्याचं म्हटलं आहे. पुन्हा एकदा लसीकरणाचं महत्त्व पटवून दिलं आहे. कोविडपासून बचाव करायचा असेल तर लसीकरण अत्यंत महत्त्वाचं असल्याचें केंद्र सरकारने सांगितलं आहे. लस घेतली नसेल तर कसा धोका वाढतो, हे सांगण्यासाठी यावेळी दिल्लीतील कोरोना मृत्यूंबाबतचा तपशील देण्यात आला.
राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रांचे ( NCDC ) संचालक डॉ. एस. के. सिंह यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली व लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. ज्यांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली नाही आणि ज्यांना इतर गंभीर आजार आहेत अशा व्यक्ती 'हाय रिस्क' गटात मोडतात. प्रातिनिधिक स्वरूपात नुसती राजधानी दिल्लीतील आकडेवारी पाहिली तर कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 64 टक्के रुग्ण लस घेतली नाही असे होते किंवा सहव्याधीग्रस्त होते. ही बाब लक्षात घेता लसीकरणाबाबत टाळाटाळ करू नका, अशी विनंतीच सिंह यांनी केली. आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनीही यावेळी लसीकरणावरच जोर दिला. कोरोना विरोधी लढ्यात लसीकरण हे सर्वात प्रमुख हत्यार ठरलं आहे. त्यामुळे लस घेतली नसेल तर तुम्ही तुमचाच जीव धोक्यात घालत आहात हे स्पष्ट आहे.