नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. 715 दिवसांतील नीचांक आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 913 नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तब्बल चार कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. सोमवारी (4 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 913 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 5,21,358 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशाचा रिकव्हरी रेट देखील चांगला आहे.
कोरोनाचा वेग मंदावला! राज्यांचे निर्बंध हटवण्याची घाई; तज्ज्ञांनी दिला 'हा' इशारा, म्हणाले...
देशात कोविड-19 प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत असताना कोरोना निर्बंध शिथील केले जात असताना, तज्ञांनी इशारा दिला आहे. कोरोना निर्बंध पूर्णपणे हटवणं खूप घाईचं असू शकतं. लोकांनी मास्कचा वापर करावा असं त्यांनी म्हटलं आहे. याच्या मदतीने कोरोना व्हायरस, इन्फ्लूएन्झा आणि स्वाइन फ्लूसारखे इतर संसर्ग टाळता येऊ शकतात. देशातील प्रसिद्ध वायरोलॉजिस्ट टी जेकब जॉन यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील साथीचा रोग संपला असल्याने, SARS-CoV-2 चे संक्रमण कमी करण्यासाठी मास्क वापरण्याची गरज नाही. पण सार्वजनिक ठिकाणी ऐच्छिक मास्क परिधान करण्यास करणं ही चांगली कल्पना आहे. कोरोनाच्या संकटात मास्क अत्यंत प्रभावी ठरत असल्याचं याआधी समोर आलं आहे.
डॉ रविशेखर झा यांनी मास्क घालणे अनिवार्य असले पाहिजे आणि ही सवय कायम ठेवली पाहिजे. कोरोना नियम आणि मास्क पूर्णपणे सोडून देणे योग्य नाही. जगभरात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आधुनिक जगाने यापूर्वी अशी महामारी पाहिली नव्हती. कोरोना महामारीचे युग विसरता कामा नये. हे खरे आहे की भारतात वेगाने लसीकरण केले गेले आहे, परंतु ही लस संसर्गापासून संरक्षण देत नाही. संसर्ग प्राणघातक असू शकत नाही, परंतु यामुळे अनेक महिने अशक्तपणा येऊ शकतो असं म्हटलं आहे. कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही. त्यामुळे निष्काळजीपणा अत्यंत घातक ठरू शकतो.