नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 31,382 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 318 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,46,368 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मध्य प्रदेशमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. पुण्याहून ट्रेनिंग करून परतलेल्या 30 जवानांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. प्रशासनात खळबळ निर्माण झाली असून मुख्यमंत्र्यांनी देखील यावर चिंता व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये तीन महिन्यांनी पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. 30 जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे सर्वजण पुण्याहून ट्रेनिंग करून परतले होते, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इंदूरमध्ये रुग्णांची संख्या वाढल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोना पॉझिटिव्ह जवानांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यात येत असून त्यांची देखील तपासणी करण्यात येत आहेत.
कोरोना नियमावलीचं पालन करा असं आवाहन
आरोग्य विभागाची टीम या सर्वांवर लक्ष ठेवून आहे. सीएमएचओ डॉ. बीएस सैत्या यांनी रुग्णालयाचा दौरा करून अधिकाऱ्यांकडून याबाबत संपूर्ण माहिती घेतल्याचं म्हटलं आहे. तसेच लोकांना कोरोना नियमावलीचं पालन करा असं देखील आवाहन हे प्रशासनाच्या वतीने सातत्याने लोकांना करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. सणासुदीच्या काळात कोरोनाचा प्रसार वाढण्याचा धोका आहे. सणसमारंभामध्ये निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. येत्या 3 महिन्यांत डेल्टा व्हेरिएंटचा मोठा धोका असल्याची माहितीही याआधी समोर आली आहे. तज्ज्ञांनी याबाबत लोकांना सतर्क केलं असून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. याच दरम्यान आता केंद्र सरकारकडून नवीन नियम जारी करण्यात आले आहेत.
सणासुदीच्या काळात निष्काळजीपणा ठरेल घातक, कोरोनाचा धोका; केंद्र सरकारकडून नवीन नियम जारी
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात अजूनही कोरोना व्हायरसची दुसरी लाट पूर्णपणे संपलेली नाही. काही राज्यांमध्ये अजूनही कोरोनाचा प्रसार कायम आहे. ज्या राज्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले आहेत, तिथेही कोरोना प्रसाराबाबत इशारा दिला गेला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकारने कोरोनाबाबत सतर्कता बाळगण्याचा सल्ला दिला आहे आणि काही नवे नियम जारी केले आहेत. राजेश भूषण यांनी 21 सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एक नवी एसओपी जारी केली गेली आहे. कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केल्या जाणाऱ्या क्षेत्रांत जिथे कोरोना संक्रमणाचा दर 5 टक्क्यापेक्षा अधिक आहेत तिथे सार्वजनिक कार्यक्रम टाळावे लागतील. ज्या क्षेत्रांमध्ये हा दर 5 टक्क्यापेक्षा कमी आहे, तिथे कार्यक्रमाआधी परवानगी घेणं गरजेचं असेल. रुग्णसंख्येतील वाढ आणि घट यावर त्या क्षेत्रातील निर्बंध आणि सूट याबाबतचे नियम ठरवले जातील.