नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,65,30,132 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,40,842 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,741 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,99,266 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालयात बेडची कमतरता, ऑक्सिजनचा मोठा तुडवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थिती नातेवाईकांनीही कोरोना रुग्णांची साथ सोडली आहे. आपलेही परके झाले आहेत. मात्र दुसरीकडे देशात असे ही काही लोक आहेत. ज्यांनी कोरोनाग्रस्तांसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांना मदतीचा हात दिला आहे.
देश कोरोनाच्या या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना काही कौतुकास्पद घटना समोर येत आहेत. एका रिक्षाचालकाने कोरोना रुग्णांसाठी आपल्या रिक्षाचं रुग्णवाहिकेत रुपांतर केलं आहे. या कठीण काळात त्याने आपल्या रिक्षातून 500 हून अधिक कोरोना रुग्णांना रुग्णालयामध्ये किंवा त्यांच्या घरी पोहचवण्याचं महत्त्वाचं काम केलं आहे. प्रेमचंद्रन असं या रिक्षाचालकाचं नाव असून तो केरळच्या कन्नूरचा रहिवासी आहे. त्याने आपल्या रिक्षात आतापर्यंत अनेक रुग्णांना मोफत पोहचवलं आहे. सुरुवातीला मी एका गर्भवती कोरोनाबाधित महिलेला रुग्णालयामध्ये पोचवण्याचे काम केले. त्यानंतर विविध ठिकाणांहून लोक मला कोरोना रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी फोन येऊ लागले असं प्रेमचंद्रन यांनी म्हटलं आहे.
लोकांची अडचणी समजून घेऊन मी लगेच त्यांना रिक्षाची सेवा देत होतो. कोणत्याही रुग्णाला रुग्णालयात पोहोचल्यानंतर रिक्षाची पूर्ण स्वच्छता केली जाते. सॅनिटायझर आणि डिटर्जंटचा वापर करून पूर्ण रिक्षा सॅनिटाईझ केली जाते. कोणाला संसर्ग होऊ नये यासाठी आम्ही खबरदारी घेतो. रुग्णांना नेत असल्याने स्वच्छता ठेवणं गरजेच आहे. कोरोनाच्या या काळात ते लोकांसाठी सेवा देत असले तरी त्यांचे कुटुंबही त्यांना या कामात मदत करत असल्याचं म्हटलं आहे. प्रेमचंद्रन गेल्या 30 वर्षांपासून रिक्षा चालवण्याचं काम करत आहेत. पण सध्या ते करत असलेल्या कामाचं सर्वत्र भरभरून कौतुक केलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भयावह! कोरोना मृतांची खरी आकडेवारी भलतीच; 60 ते 80 लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता, WHOचा मोठा खुलासा
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्णाण झाले आहे. अनेक देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. कोरोना महामारीत होणाऱ्या सर्वच मृत्यूंची नोंद झालेली नाही असं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सरकारी आकडेवारीनुसार जे आकडे आपल्यासमोर येत आहेत त्यापेक्षा खूप जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. WHO म्हणण्यानुसार आतापर्यंत 60 ते 80 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, आत्तापर्यंत अधिकृत जगात 34.46 लाख लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. वार्षिक ग्लोबल हेल्थ स्टॅटिस्टिक्स रिपोर्ट जारी करताना जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे की, कोरोनामुळे वर्ष 2020 मध्येच जवळपास 30 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, जगातील विविध देशांनी केलेल्या नोंदीनुसार ही आकडेवारी 12 लाखांच्या आसपास आहे.