नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत मिळत आहे. रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर गेली असून दोन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले असताना मध्य प्रदेशच्या दमोहमध्ये झालेली पोटनिवडणूक अनेकांच्या जीवावर बेतली आहे. निवडणुका पार पाडण्यासाठी दमोह जिल्ह्यातील 800 शिक्षकांची ड्युटी लावण्यात आली होती. यापैकी 200 शिक्षकांनानिवडणूक प्रशिक्षण आणि मतदान संपल्यानंतर कोरोनाची लागण झाली आहे. तर ड्युटीवर असलेल्या कमीतकमी 17 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
निवडणुकीमुळे कोरोनाची लागण झाली आणि त्यातच अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये शिक्षक, राजकीय कार्यकर्ते आहेत. शिक्षकांच्या कुटुंबीयांनी सरकारवर रोष व्यक्त केला आहे. दमोह येथील 58 वर्षीय सरकारी शिक्षक, ब्रजलाल अहिरवार यांनाही पोटनिवडणुकीवर तैनात करण्यात आले होते. त्यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांचा 25 वर्षीय मुलगा रोहित विचारात पडला आहे. की जर त्याने आपल्या वडिलांना निवडणुकीच्या ड्युटीवर जाण्यापासून रोखले असेल तर काय झाले असते? रोहितने माझ्या वडिलांची इच्छा होती की विधानसभा पोटनिवडणूक पुढे ढकलण्यात यावी, परंतु पीपीई किट मिळाल्यामुळे कोरोना होऊ शकत नाही, असा त्यांचा विश्वास होता. दोन दिवसांनी ते परत आले.
वडिलांना ताप आला आणि 5 मे रोजी जिल्हा रुग्णालयात त्यांचे निधन झाले. दुसर्याच दिवशी, त्यांची 51 वर्षीय पत्नी प्यारीबाई यांचाही कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. पोटनिवडणूक कर्तव्यावर सामील झाल्यानंतर कोरोना व्हायरसने मृत्यू झालेल्या 17 शिक्षकांची दमोह प्रशासनाने यादी केली आहे. जिल्हाधिकारी कृष्णा चैतन्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आतापर्यंत आम्हाला 24 शिक्षकांच्या नातेवाईकांनी अर्ज दिले आहेत. ज्यांनी ड्युटी नंतर कोरोनामुळे आपला जीव गमावला. यापैकी सहाजण पोटनिवडणुकीच्या कर्तव्यात सक्रियपणे सहभागी होते तर इतर संबंधीत कामात गुंतले होते. आतापर्यंत आम्ही 17 शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या शिक्षकांच्या कुटूंबियांना नुकसान भरपाईसाठी निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणाऱ्या अन्य अर्जांची आम्ही पडताळणी करीत आहोत." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
तेलंगणात एका शाळेतील शिक्षिकेला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. संध्या असं या शिक्षिकेचं नाव असून त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांनी निवडणूक केंद्रावर ड्युटी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली. नागार्जुनसागर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिक्षकांना निवडणूक ड्युटीवर बोलावण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संध्या यांच्या पतीने निवडणुकांमुळे कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचं म्हटलं आहे. संध्या यांना एक आठ वर्षांची मुलगी आहे. राजकारण आणि निवडणुकांच्या दरम्यान कोरोना व्हायरसमुळे कुटुंब उद्ध्वस्त झालं असा गंभीर आरोप संध्या यांचे पती कमनपत्ती मोहन राव यांनी केला आहे. 20 एप्रिल रोजी संध्या यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती.
एका आठवड्यानंतर त्यांची तब्येत आणखी बिघडल्याने त्यांना हैदराबादच्या रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. परंतु 8 मे रोजी त्यांचे निधन झाले. संध्या यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. "फक्त माझी पत्नीच नाही, तर माझा जीव गेला आहे. निवडणुका का झाल्या? फक्त एका आमदारासाठी इतक्या लोकांचा मृत्यू झाला. माझ्या पत्नीचा देखील मृत्यू झाला. माझे कुटुंब उद्ध्वस्त झाले. लॉकडाऊन किंवा लसीकरणानंतरही निवडणुका होऊ शकल्या असत्या. सर्वांचे लसीकरण झाल्यानंतर सुद्धा निवडणुका होऊ शकल्या असत्या. निवडणुका या लोकांच्या जीवनापेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत का?" असं संध्या यांच्या पतीने म्हटलं आहे. संध्या निवडणूक ड्युटीसाठी हलिया येथे गेल्या होत्या. तेथे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दोन दिवसांपूर्वी एक प्रचंड जाहीर सभा घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री, टीआरएस पक्षाचे उमेदवार आणि शेकडो लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले होते.