नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 30,570 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. अशीच एक सकारात्मक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने मृत्यूवर मात केली आहे. कोरोनाविरोधातील लढाई त्यांनी यशस्वीरित्या जिंकली आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठचे रहिवासी असलेल्या विश्वास सैनी यांनी कोरोना विरुद्धचं युद्ध जिंकलं आहे.
तब्बल 130 दिवस कोरोनाशी झुंज देऊन अखेर मृत्यूवर मात केली आहे. त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विश्वास सैनी यांना 28 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. तब्येत बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या वेळी त्याची स्थिती इतकी गंभीर होती की डॉक्टरांनीही त्याच्या जगण्याची आशा सोडली होती पण विश्वास यांची इच्छाशक्ती जबरदस्त होती. त्यामुळे त्याने या संकटावर मात केली. जवळपास महिनाभर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या रुग्णाने जिंकलं कोरोनाचं युद्ध
विश्वास सैनी यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सकारात्मक वृत्तीमुळेच ते यातून बरे झाल्याची माहिती दिली आहे. इतक्या दिवसांनी घरी परत आल्यावर त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. "मला कोरोनाची लागण झाली तेव्हा प्रचंड भीती वाटली. कारण माझ्या आजूबाजूला कोरोनामुळे अनेक जणांचा मृत्यू होताना पाहत होतो. त्यामुळे आपणही यातून वाचणार नाही, असं मला वाटत होतं; पण माझ्यावर उपचार करणारे डॉक्टर्स मला सतत धीर देत होते. प्रोत्साहन देत होते. डॉक्टरांच्या उत्तम उपचारांमुळे आणि प्रेरणेमुळे मला बळ मिळालं आणि मी बरं होण्यावर लक्ष केंद्रित केलं" असं विश्वास यांनी म्हटलं आहे.
कोरोनाचा तरुणांच्या फुफ्फुसावर नेमका कसा होतोय परिणाम?; रिसर्चमधून मोठा खुलासा, तज्ज्ञ म्हणतात....
कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक वाईट परिणाम फुफ्फुसांवर होत असल्याचं याआधी समोर आलं आहे. मात्र आता करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनात एक मोठा दावा करण्यात आला आहे. कोरोना संसर्गामुळे तरुण व्यक्तींमध्ये फुफ्फुसांचे नुकसान होण्याचा धोका खूपच कमी असल्याचं म्हटलं आहे. कोरोनामुळे तरुणांच्या फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत नाही. फुफ्फुसे पूर्वीप्रमाणे काम करतात, असा दावा नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चमधून करण्यात आला आहे. लहान मुलं (Children) आणि किशोरवयीन मुलांमध्ये कोरोनामुळे फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचं आढळून आलं आहे, असा दावा आणखी एका रिसर्चमध्ये करण्यात आला आहे. कोरोनापूर्वी त्यांची फुफ्फुसे ज्या क्षमतेनं काम करत होती, त्याच क्षमतेनं ते कोरोनानंतरही काम करत असल्याचं आढळलं आहे. गंभीर स्थिती असलेल्या मुलांच्या फुफ्फुसांवर मात्र परिणाम झाला असल्याचा निष्कर्ष या रिसर्चमध्ये नमूद करण्यात आला आहे.