नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात धोका वाढला असून ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. दिवसागणिक आकडा वाढत असून एकूण रुग्णांची संख्या 1700 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येने देखील चिंतेत भर टाकली आहे. देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच दरम्यान चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 33,750 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 123 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे.
कोरोनाच्या संकटात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी तिसऱ्या लाटेबाबत खूप मोठं विधान केलं आहे. यासोबतच त्यांनी नागरिकांना देखील महत्त्वाचं आवाहन केलं आहे. "कोरोनाची तिसरी लाट आली आहे. त्याचा सामना जनतेच्या सहकार्याने करायचा आहे. आवश्यक व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत पण त्यासोबतच आपल्याला आता अधिक जागरूक आणि सतर्क राहावं लागणार आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाला काळजी घ्यावी लागणार आहे" असं आवाहन शिवराजसिंह चौहान यांनी केलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
मध्य प्रदेशमध्ये गेल्या 24 तासांत राज्यात 124 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यात सर्वाधिक 62 रुग्णांची नोंद इंदूरमध्ये झाली आहे तर भोपाळमध्ये 27 रुग्ण आढळले आहेत. मात्र, राज्यात पूर्ण खबरदारी बाळगण्यात येत असून कोविड नियम काटेकोरपणे पाळण्याबाबत सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. सोमवारी (3 जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 33 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा चार लाख 81 हजारांवर पोहोचला आहे. रुग्णालयात अनेकांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 3,42,95,407 लोक बरे झाले आहेत.
देशाचा पॉझिटिव्हीटी रेट हा 1.68 टक्क्यांवर
कोट्यवधील लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. देशाचा पॉझिटिव्हीटी रेट हा 1.68 टक्क्यांवर आहे. ओमायक्रॉन वेगाने पसरत असून आता 1700 जणांना लागण झाली आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि केरळमध्ये ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशातील ओमायक्रॉन रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नवी लाट येऊ शकते अशी माहिती एका रिसर्चमधून समोर आली आहे. ही लाट काही दिवसांसाठी असेल पण ती मोठ्या प्रमाणात लोकांना संसर्गित करेल असं म्हटलं आहे. ओमायक्रॉनचा भारतात आता कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढत असल्याने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.