नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 3,07,09,557 वर पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 45,892 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 817 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,05,028 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान कोरोचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी याचे पालन होत नसल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तराखंडमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. कोरोना नियमावलीची एैशीतैशी अन् सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला आहे.
लोकांना कोरोनाची चिंताच नसून नियमांचीही अजिबात भीती नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. धबधब्यात भिजण्यासाठी लोकांनी तुफान गर्दी केली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं असताना लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा पाहायला मिळत आहे. मास्क न लावता लोकांनी शेकडोच्या संख्येने गर्दी केली आहे. उत्तराखंडच्या मसूरीमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये केम्पटी फॉल्सवर मोठ्या संख्येने पर्यटक आले असून मजा करत आहेत. मास्क आणि सोशल डिस्टंसिंगशिवाय लोक असलेले पाहायला मिळत आहे.
देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना दुसरीकडे लोकांचा अशा प्रकारे हलगर्जीपणा वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी कोरोना नियमावलीचे तीन-तेरा वाजलेले पाहायला मिळाले. मसूरीमध्ये फक्त धबधब्याजवळच नाही तर कुल्डी बाजार, मॉल रोडवरही हजारो पर्यटकांची गर्दी होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारतात कोरोनाचा वेग मंदावत असला तरी डेल्टा प्लसचा कहर पाहायला मिळत आहे. मात्र अनेक ठिकाणी लोकांचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. काही जण मास्क न लावता फिरत आहेत. कोरोनाच्या संकटात मास्क अत्यंत महत्त्वाचा आहे. डेल्टा व्हॅरिएंट (Delta Variant) अधिक घातक असल्यानं आपल्याला कोरोनाच्या नियमांचं पालन अधिक काटेकोरपणे करावं लागणार आहे. त्यात मास्क हे सर्वांत मोठं शस्त्र आहे. कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटनुसार मास्क घालणं किती गरजेचं आहे.
धोका वाढला! देशात Delta Plus चा हाहाकार, नेमका कसा मास्क वापरावा?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
नवी दिल्लीतल्या सर गंगाराम हॉस्पिटलचे डॉक्टर (लेफ्टनंट जनरल) वेद चतुर्वेदी यांनी मास्क घालण्याबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे. मास्कबाबत केवळ एकाच देशात नाही, तर जगभर संशोधन करण्यात आलं. तीन प्रकारचे मास्क आहेत. एक कॉटन म्हणजे साधा कापडी मास्क, दुसरा सर्जिकल आणि तिसरा एन95. यापैकी एन95 हा मास्क सर्वांत जास्त सुरक्षित असून, याचा सर्वाधिक वापर डॉक्टर करतात. तुम्हाला जवळच कुठे तरी जायचं असेल तर कॉटन मास्कसह सर्जिकल मास्कदेखील वापरा, असा सल्ला चतुर्वेदी देतात. ज्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झालेला असण्याची शक्यता आहे, अशा व्यक्तीला भेटण्याची वेळ आल्यास डबल मास्क लावा किंवा एन95 मास्कदेखील (N 95 Mask) वापरू शकता. मास्कशिवाय घराबाहेर पडू नका, असंही डॉ. चतुर्वेदी सांगतात.