नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुलांना कोरोनाचा असणारा धोका याबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. लोकांमध्ये यामुळे संभ्रम आहे. याच दरम्यान आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. तज्ज्ञांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. नीति आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही. के. पॉल यांनी बहुतेक वेळा लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या कोरोनाच्या प्रकरणांमध्ये कोणतीही लक्षणं नसतात. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ क्वचितच येते असं म्हटलं आहे.
काही मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते, पण त्यांचं प्रमाण खूप कमी असू शकेल असं देखील पॉल यांनी म्हटलं आहे. कोरोनाची लागण होण्याची शक्यता असणाऱ्या मुलांवर उपचार करण्यासाठी आवश्यक त्या आरोग्य सुविधांची उभारणी करण्यासारख्या उपाययोजना केल्या जात आहेत असंही नमूद केलं आहे. एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया यांनी भारत किंवा जगभरातून असा कोणताही डेटा मिळालेला नाही ज्यावरून हे सिद्ध होऊ शकेल की लहान मुलांवर करोनाच्या पुढच्या लाटांचा गंभीर परिणाम होईल. सुदृढ मुलं या सौम्य लक्षणांवर मात करू शकतात. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडत नाही असं म्हटलं आहे.
लहान मुलांना कोरोनापासून पूर्णपणे संरक्षण देण्यासाठी कोवॅक्सिन लसीची चाचणी लहान मुलांवर सुरू करण्यात आली आहे. NTAGI गटाचे प्रमुख डॉ. एन. के. चोप्रा यांनी यासंदर्भात 25 जून पासून 2 ते 18 या वयोगटातल्या मुलांवर कोवॅक्सिनची चाचणी सुरू करण्यात आली आहे. या चाचणीचे निष्कर्ष सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये हाती येतील. मुलांना कaरोनाची लागण होऊ शकते पण ते गंभीर आजारी पडणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. लहान मुलांना असणाऱ्या कोरोनाच्या धोक्याविषयी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून तज्ज्ञांच्या मतानुसार भूमिका मांडण्यात आली आहे.
लहान मुलांना कोरोनाची लागण जरी झाली, तरी ते गंभीररीत्या आजारी पडणार नाहीत किंवा त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येणार नाही असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशन, क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 3,03,62,848 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 45,951 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 817 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,98,454 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.