नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 22 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांचा बळी घेतला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींच्या वर गेला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 35,662 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सणसमारंभामध्ये निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. येत्या 3 महिन्यांत डेल्टा व्हेरिएंटचा मोठा धोका असल्याची माहिती आता समोर आली आहे. तज्ज्ञांनी याबाबत लोकांना सतर्क केलं असून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन महिन्यांत अनेक सण येणार आहेत. याच दरम्यान काही समारंभाचं देखील आयोजन करण्यात येईल. मात्र यामुळेच लोकांची मोठ्या संख्येने गर्दी होईल आणि हेच कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यामागचं कारण ठरू शकतं. त्यामुळे या काळात लोकांनी अत्यंत सतर्क राहणं गरजेचं आहे. घरच्या घरीच सण साजरे करा. सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आहे. सणांच्या काळात लोकांचा हलगर्जीपणा चिंता वाढवू शकतो. त्यामुळचे कोरोना नियमांचं पालन करा असं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात येत आहे.
सणांमध्ये निष्काळजीपणा ठरू शकतो जीवघेणा
ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते. यातच डेल्टा व्हेरिएंट देखील थैमान घालून शकतो. जर लोकांनी सणसमारंभामध्ये कोरोना नियमावलीचं पालन केलं नाही तर परिस्थिती आणखी बिघडू शकते असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाच्या संकटात एक आनंदाची बातमी दिली आहे. WHO ने दिलासादायक माहिती दिली आहे. गेल्या आठवड्यात जगभरात नोंदवण्यात आलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मागील दोन महिन्यांच्या काळात पहिल्यांदा झालेली ही मोठी घट आहे. जगातील सर्वच भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच बळींच्या संख्येतही घट झाली आहे.
सुखावणारी आकडेवारी! कोरोनाच्या संकटात WHO ने दिली आनंदाची बातमी; जगभरातील रुग्णसंख्येत झाली घट
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या ही दक्षिण-पूर्व आशिया भागात झाली आहे. तर आफ्रिकेमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यू दरात सात टक्क्यांची वाढ झाली आहे. अमेरिका, ब्रिटन, भारत, इराण आणि तुर्कीमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. वेगाने पसरणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग तब्बल 180 देशांमध्ये झाला आहे. अनेक ठिकाणी तर गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट हा अधिक घातक असल्याचं म्हटलं जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, वयस्करांच्या तुलनेत कोरोना व्हायरची लागण मुलांना आणि तरुणांना कमी प्रमाणात होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची मोठ्या प्रमाणावर लागण होत असल्याचेही समोर येत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. तसेच तरुणांचा मृत्यूदर देखील कमी आहे.