नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वेग मंदावताना पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 796 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 521710 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण आता पुन्हा एकदा कोरोनामुळे चिंतेत भर पडली आहे. विद्यार्थी कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. चार शाळेतील 19 विद्यार्थी आणि शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे पालकांचं टेन्शन आणखी वाढलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, NCR मधील तीन शाळांमध्ये कोरोना रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. गाझियाबाद आणि नोएडामधील चार शाळांमध्ये जवळपास 19 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. नोएडाच्या खेतान स्कूलमधील सर्वाधिक रुग्ण आहेत यामध्ये तीन शिक्षक देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. याशिवाय नोएडाच्या सेक्टर 30 मधील DPS शाळेतील एका विद्यार्थ्याला आणि गाझियाबादच्या सेंट फ्रांसिस स्कूल आणि मंगलम स्कूलमधील पाच विद्यार्थ्यांना संसर्ग झाला आहे.
कोरोनाची लागण झाल्यानंतर दोन्ही शाळांनी तीन दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी त्यांनी ही खबरदारी घेतली आहे. गाझियाबादच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्यानंतर शाळा सॅनेटाईझ करण्यात आली आहे. तसेच रॅपिड टेस्ट देखील करण्यात येत आहेत. तर काही ठिकाणी ऑनलाईन क्लासेस पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. यामुळे प्रशासनाची देखील चिंता वाढली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालये ही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता अनलॉकमध्ये काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आता सर्वच राज्यात पाऊल उचललं जात आहेत. अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा सुरू करणं हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महागात पडू शकतं. देशात कोरोनाचा वेग ओसरलेला पाहायला मिळत असताना आता काही ठिकाणी कोरोना पुन्हा एकदा हात-पाय पसरत असल्याचं दिसत आहे.